For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एरिगेसीचा आणखी एक पराभव, गुकेशकडून विजयाची नोंद

06:00 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
एरिगेसीचा आणखी एक पराभव  गुकेशकडून विजयाची नोंद
Advertisement

वृत्तसंस्था/विज्क अॅन झी, नेदरलँड्स

Advertisement

भारताचा अव्वल मानांकित बुद्धिबळपटू अर्जुन एरिगेसी महत्त्वाच्या क्षणी जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरच्या कौशल्याशी बरोबरी करू शकला नाही आणि येथे झालेल्या टाटा स्टील मास्टर्सच्या 10 व्या फेरीत त्याला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, विश्वविजेता डी. गुकेशने युवा प्रतिभावान यागिज कान एर्दोगमुसविऊद्ध एंडगेममध्ये उत्कृष्ट खेळ करत स्पर्धेत पुनरागमन केले. काळ्या मोहऱ्या घेऊन खेळताना गुकेशने आणखी एक निर्णायक विजय मिळवला आणि संभाव्य 10 पैकी 5 गुणांसह आपली स्थिती सुधारली.

तथापि, जागतिक विजेता म्हणून आपले वर्चस्व खऱ्या अर्थाने सिद्ध करण्यासाठी या भारतीय खेळाडूला शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये अपवादात्मक कामगिरी करावी लागेल. काही दिवसांपूर्वी एरिगेसीची वाटचाल जोरात चालली होती, परंतु मध्येच त्याची लय बिघडली आणि आता तो गुणतालिकेच्या खालच्या भागात आहे. 10 सामन्यांतून केवळ चार गुणांसह या सर्वोच्च मानांकित भारतीय खेळाडूला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी खूप मोठी मजल मारावी लागेल.

Advertisement

क्लोज्ड ऊई लोपेझमध्ये स्थितीनुसार केलेली चूक अनेकदा अक्षम्य असते आणि नेमकी हीच चूक एरिगेसीच्या पराभवाचे कारण ठरली. व्हिन्सेंट कीमरने संधी साधण्यात तत्परता दाखवली आणि त्यानंतर या जर्मन खेळाडूने मागे वळून पाहिले नाही. त्याने स्वत: आतापर्यंत संमिश्र कामगिरी केली आहे. दरम्यान, आर. प्रज्ञानंदने फ्रेंच डिफेन्सच्या सामन्यात हॅन्स मोके निमनसोबत बरोबरी साधली. हा असा सामना होता ज्यात दोन्ही खेळाडूंना फारशा गुंतागुंतीची संधी मिळाली नाही. प्रज्ञानंदच्या फ्रेंच डिफेन्स ऊबिनस्टाइन व्हेरिएशनने उच्चभ्रू वर्तुळात भुवया उंचावल्या असतील, कारण हा युवा भारतीय बहुप्रतिक्षित कँडिडेट्स स्पर्धेपूर्वी वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयोग करत आहे.

निमन इतका आश्चर्यचकीत झाला की, त्याने आपल्या पांढऱ्या मोहऱ्यांसह पूर्ण ताकदीने खेळ केला नाही. दोन्ही खेळाडूंनी नियमित अंतराने प्रतिस्पर्धी मोहरे गारद केले आणि एका पूर्णपणे बरोबरीच्या ऊक-अँड-पॉन्स एंडगेमपर्यंत पोहोचले. जर्मनीच्या मॅथियास ब्लूबाउमने मागील फेरीत गुकेशला हरवल्यानंतर आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत अनिश गिरीला पराभूत केले, तर हॉलंडच्या जॉर्डन व्हॅन फोरेस्टने जावोखिर सिंदारोव्हसोबत बरोबरी साधली आणि या दोघांनीही आपल्या गुणांमध्ये वाढ करून सहा गुणांपर्यंत मजल मारली आहे.

Advertisement
Tags :

.