मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरुद्ध आणखी एक गुन्हा
मुडा प्रकरणाला नवा ट्विस्ट : आरोपीच्या पुतणीने मागितला हिस्सा
बेंगळूर : म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या (मुडा) भूखंड वाटप प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पत्नी बी. एम. पार्वती यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुडा प्रकरणातील आरोपी क्र. 4 देवराजू यांच्या भावाची मुलगी (पुतणी) जमुना हिने म्हैसूरच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेत मलाही हिस्सा द्यावा, अशी मागणी जमुना हिने केली आहे.
म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाने म्हैसूरच्या केसरे गावातील बी. एम. पार्वती यांच्याकडून जमीन संपादित केली होती. या जमिनीच्या मोबदल्यात 14 भूखंड मंजूर केले होते. मात्र, या भूखंड वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर पार्वती यांनी 14 भूखंड मुडाला परत केले होते. केसरे गावातील सर्व्हे नं. 464 मधील 3.16 एकर जमीन सिद्धरामय्यांचे मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी यांनी बहीण पार्वती यांना दान स्वरुपात दिली होती. ही जमीन मल्लिकार्जुन स्वामी यांनी देवराजू यांच्याकडून खरेदी केली होती.
आता देवराजू यांचे ज्येष्ठ बंधू मैलारय्या यांची मुलगी जमुना हिने म्हैसूरच्या जेएमएफसी न्यायालयात दावा दाखल केला आहे. बी. एम. पार्वती यांच्या नावाने असणारी जमीन देवराजू यांची नव्हे, माझे वडील मैलारय्या यांची आहे. त्यामुळे या प्रकरणात जमुना यांनी पार्वती यांच्याकडून मुडाने संपादित केलेल्या जमिनीवर माझाही हक्क आहे, असे म्हटले आहे. या प्रकरणात जमुना हिने सिद्धरामय्यांची पत्नी पार्वती, देवराजू, मल्लिकार्जुन स्वामी 12 जणांविरुद्ध दावा दाखल केला आहे. माझे काका देवराजू यांनी फसवून जमीन विक्री केली आहे. ही जमीन सुरुवातीला वडील मैलारय्या यांच्या नावाने होती. जमीन नावावर करून देतो असे सांगून देवराजू यांनी माझी आणि आईची स्वाक्षरी घेतली, असा आरोप जमुनाचा भाऊ मंजुनाथ याने केला आहे.