For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग

06:32 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग
Advertisement

अखनूर क्षेत्रात पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार, भारताचे चोख प्रत्युत्तर

Advertisement

वृत्तसंस्था / जम्मू

जम्मू-काश्मीरच्या अखनूर क्षेत्रात सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार करुन शस्त्रसंधीचा भंग केला आहे. ही घटना 10 सप्टेंबरला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या आसपास घडली. गेल्या सात महिन्यांमध्ये पाकिस्तानकडून प्रथम अशी आगळीक करण्यात आली आहे. भारताच्या सैन्यानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचा एक सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचेही काही सैनिक जखमी झाल्याचे दिसून येत आहे. तथापि, पाकिस्तानने आपले सैनिक जखमी झाल्याचे मान्य केलेले नाही. मात्र, भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर त्याच्या सैनिकांची पळापळ झाल्याचे दिसून आले आहे.

चार वेळा शस्त्रसंधीचा भंग

पाकिस्तानकडून गेल्या वर्षभरात चार वेळा शस्त्रसंधीचा भंग करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. 14 फेब्रुवारी 2024 या दिवशी, म्हणजे साधारणत: सात महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या सैनिकांनी मकवाल भागात सीमेवर 20 मिनिटे गोळीबार केला होता. भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले होते. या चकमकीत कोणीही जखमी झाले नव्हते, अशी माहिती देण्यात आली होती. 8 नोव्हेंबर 2023 या दिवशी सांबा क्षेत्राच्या रामगढ भागात पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक सैनिक हुतात्मा झाला होता. 26 ऑक्टोबर 2023 या दिवशी जम्मूच्या अरनिया भागात पाकिस्तानी सेनेने हातगोळे फेकले होते. त्यावेळी सीमा सुरक्षा दलाचा एक सैनिक हुतात्मा झाला होता. तर एक महिला जखमी झाली होती. 17 ऑक्टोबर 2023 या दिवशी पाकिस्तानी रायफल्सच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन सैनिक जखमी झाले होते. भारतानेही पाकिस्तानला हानी पोहचविली होती.

2021 मध्ये शांती समझोता

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2021 मध्ये म्हणजे तीन वर्षांपूर्वी शस्त्रसंधी करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दोन वर्षे पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सीमेवर गोळीबार केला नाही. मात्र 2023 मध्ये शस्त्रसंधी तोडण्यात आली होती. भारतानेही प्रत्येक वेळी पाकिस्तानला जशास तसे या न्यायाने वागविले आहे.

Advertisement
Tags :

.