जर्मनीत पुन्हा कार हल्ला, 1 जण ठार
वृत्तसंस्था / मॅनहेम
जर्मनी या देशात पुन्हा एकदा गर्दीत कार घसवून एका व्यक्तीचा जीव घेण्यात आला आहे. हा दहशतवादी हल्लाच असून त्यात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या देशातील मॅनहेम या शहरातील एका पादचारी मार्गावर एका दहशतवाद्याने कार घुसविली, अशी माहिती या शहराच्या प्रशासनाने दिली आहे.
या प्रकरणी एका कारचालकास अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या हल्ल्यात किती लोक सहभागी होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. येत्या काही दिवसांमध्ये या हल्ल्यामागचे कारस्थान उघड होण्याची शक्यता आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात आले असून वेगाने तपास करण्यात येत आहे. हल्ला झालेल्या भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून अन्य हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके सज्ज करण्यात आली आहेत. शहरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून धोकादायक परिस्थिती असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे लोकांना या शहराच्या विरळ वस्तीच्या भागात न जाण्याची सूचना सोमवारी संध्याकाळी करण्यात आली.
जखमींवर उपचार
या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर मॅनहेम विद्यापीठ रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. घटना घडताक्षणीच या विद्यापीठाच्या रुग्णालयाला सज्ज राहण्याची सूचना करण्यात आली होती. तसेच अतिरिक्त साधनसामग्री सज्ज ठेवण्याचा आदेशही देण्यात आला होता. हल्ल्याची घटना घडल्यानंतर शहरातील सर्व लोकांना विशिष्ट अॅपच्या माध्यमातून सावधगिरीचा इशारा देण्यात आला होता. या घटनेची विशेष माहिती अद्याप देण्यात आली नसली, तरी हा दहशतवादी हल्लाच असल्याचे निश्चित आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जर्मनीत घडलेल्या गेल्या दोन महिन्यांमध्ये घडलेली ही दुसरी कारहल्ला घटना असल्याचे दिसून येत आहे.