हाफिज सईदला आणखी एक झटका
दहशतवादी कैसर फारुखची पाकिस्तानात हत्या : पुत्रही बेपत्ता
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांना सध्या वेचून वेचून लक्ष्य केले जात आहे. आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी कैसर फारुख आता मारला गेला आहे. सोशल मीडियावर एक सीसीटीव्ही फुटेज प्रसारित झाले असून यात लष्कर-ए-तोयबाशी निगडित फारुखच्या हत्येनंतर काही लोक पळताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ कधीचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु हे फुटेज कराची येथील असल्याचे समजते. कैसर फारुख हा एक मोस्ट वाँटेड दहशतवादी होता.
कैसर फारुख काही लोकांसोबत चालत असताना अचानक गोळीबार होतो. कैसरसोबतचे लोक जीव वाचविण्यासाठी पळत असल्याचे अन् एक इसम जमिनीवर कोसळल्याचे फुटेजमध्ये दिसून येते. खाली कोसळलेला इसम दहशतवादी कैसर फारुख असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक अधिकारी या घटनेकडे हत्येच्या स्वरुपात पाहत आहेत. अज्ञात हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पलायन करण्यापूर्वी एका ठिकाणी गोळीबार केला. यात कैसर अन् फारुख शाकिर हे जखमी झाले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले, जेथे कैसर फारुखचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अलिकडच्या काळात भारतासाठी मोस्ट वाँटेड असलेले अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. कैसरला लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचा निकटवर्तीय मानले जात होते. कराचीत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी कैसर मारले गेल्याचे वृत्त हे हाफिज सईदचा पुत्र गायब झाल्यानंतर समोर आले आहे. हाफिजचा पुत्र कमालुद्दीन हा 26 सप्टेंबरपासून गायब आहे. कमालुद्दीनचा मृतदेह पोलिसांना मिळाल्याचे सांगितले जात असले तरीही याची पुष्टी होऊ शकलेली नाही. हाफिज सईद सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहे.