दिल्ली निवडणुकीपूर्वी भाजपला आणखी एक झटका
बीबी त्यागी यांचा ‘आप’मध्ये प्रवेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणूक नजीक आल्याने दिल्लीत आता पक्षांतराच्या घडामोडींना वेग आला आहे. लक्ष्मीनगर मतदारसंघातील भाजप नेते बीबी त्यागी यांनी सोमवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आप आमदार दुर्गेश पाठक यांनी त्यागी यांना आम आदमी पक्षाचे सदस्यत्व प्रदान केले आहे.
त्यागी हे भाजपचे मोठे नेते राहिले असून त्यांनी अनेक दशकांपर्यंत तळागाळात जनतेच्या मुद्द्यांवर काम केले आहे. त्यागी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्याने आम्हाला आनंद आहे. त्यांचा दीर्घ राजकीय अनुभव आणि जनतेच्या सेवेबद्दलची प्रतिबद्धता आमच्यासाठी एक अनमोल संपत्ती असल्याचे वक्तव्य सिसोदिया यांनी केले आहे.
दिल्लीत कामाचे राजकारण होत आहे. दिल्लीत शाळा, रुग्णालयांची स्थापना होत आहे. विजेचे बिल शून्य येत आहे. महिलांना मोफत बसप्रवासाची सुविधा मिळत आहे. वृद्धांना मोफत तीर्थयात्रा घडविली जात आहे. याचमुळे दिल्लीचे लोक केजरीवाल यांना स्वत:चा पुत्र, बंधू मानत असल्याचा दावा सिसोदिया यांनी केला आहे.