पाकिस्तानात पुन्हा हल्ला, अनेक ठार
लष्करी तळावर बंडखोरांनी केला आत्मघाती स्फोट
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
पाकिस्तानात बलोच बंडखोरांनी रेल्वेचे अपहरण केल्याच्या घटनेला 24 तासही उलटण्याच्या आत त्या देशात आणखी एक आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याचे लक्ष्य खैबर पख्तुनख्वा प्रांतातल्या टांक जिल्ह्यातील पाकिस्तान सेनेचा तळ हे होते. या आत्मघाती हल्ल्यात तळावरील अनेकजण ठार झाल्याचे वृत्त आहे. अद्याप जीवितहानीचा नेमका आकडा देण्यात आलेला नाही. या हल्ल्यानंतर या सेनातळाच्या परिसरात जोरदार चकमक होत आहे. अनेक बंडखोर आणि सैनिक एकमेकांवर गोळीबार करत असून मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूंची जीवितहानी होत असल्याची माहिती देण्यात आली. हा हल्ला तेहरिक ए तालिबान (पाकिस्तान) या संघटनेने केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
मोठ्या प्रमाणात जीवितहानी
आत्मघाती स्फोट या तळाच्या आतल्या बाजूला करण्यात आला. त्यामुळे अनेक सैनिक ठार झाले असण्याची शक्यता आहे. सैनिकांनी केलेल्या प्रतिकारात सात ते आठ बंडखोरही टिपले गेल्याचे वृत्त पाकिस्तानच्या प्रशासनाने प्रसिद्ध केले आहे. नेमकी कोणत्या बाजूची हानी अधिक झाली, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. ही चकमक रात्री उशीरा शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हाही होत होती. या वर्षात पाकिस्तानच्या सेनातळावर करण्यात आलेला हा प्रथमच हल्ला आहे.
चौकीवर हल्ला
सेना तळाप्रमाणेच अफगाणिस्तानच्या सीमारेषेवर असणाऱ्या पाकिस्तानच्या जनदोला येथील एका चौकीवरही हल्ला करण्यात आला आहे. मात्र, हा हल्ला परतवून लावण्यात सैनिकांना यश आल्याची माहिती देण्यात आली. या हल्ल्यातही नेमकी किती हानी झाली, हे अद्याप अज्ञात आहे. तथापि, दोन दिवसांमध्ये हल्ल्याच्या दोन मोठ्या घटना घडल्याने पाकिस्तानला धक्का बसला आहे.
रेल्वे अपहणासंबंधी अनिश्चितता
क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसचे अपहरण बुधवारी करण्यात आले होते. हे अपहरणकांड संपुष्टात आणल्याची आणि सर्व बंडखोरांना ठार केल्याची घोषणा पाकिस्तानच्या प्रशासनाने केली असली, तरी बंडखोरांनी ती फेटाळली आहे. अद्यापही आमच्या ताब्यात 150 हून अधिक सैनिक आहेत. आम्ही त्यांचे काहीही करु शकतो, अशी धमकी बंडखोरांनी दिली आहे. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे, याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही, असे अनेक तज्ञांचे मत आहे.
माध्यमांकडून एकांगी वृत्ते
रेल्वे अपहरण आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी झालेला सेनातळावरील हल्ला यांच्या संदर्भात पाकिस्तानातील प्रसारमाध्यमे एकांकी धोरण स्वीकारत असल्याचा आरोप केला जात आहे. दोन्ही हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या सेनेची मोठी हानी झाली असली तरी या हानीची वृत्ते दाबून ठेवण्यात येत असल्याची टीका केली जात आहेत. काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींनी या भागाला भेट दिली असता त्यांना परिस्थिती अद्यापही अस्थिर असल्याची जाणीव झाली असल्याची नोंद त्यांनी केली असून दोन्ही बाजूंकडून एकमेकांच्या केलेल्या हानीविषयी परस्परविरोधी वृत्ते दिली जात आहेत. अपहृत रेल्वे अद्यापही हलविण्यात आलेली नाही, असे दिसते.
अधिकाऱ्यांची बैठक
रेल्वे अपहरणानंतर बुधवारी रात्री उशीरा पाकिस्तानच्या नागरी आणि सेना अधिकाऱ्यांच्या एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अपहरणाचा प्रतिकार करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कारवाई हाती घेण्यात आली. ती रात्री उशीरार्पंत पूर्ण करण्यात आली, अशी माहिती देण्यात आली. पाकिस्तानच्या गुप्तचरांवरही ठपका ठेवण्यात आला असून या हल्ल्यांची आधी माहिती काढण्यात त्यांना अपयश आल्याचा आरोप करण्यात येत आहे. बलुचिस्तानमध्ये अद्यापही तणावग्रस्त स्थिती असल्याचे वृत्त आहे.