होर्मुझमध्ये पुन्हा हल्ला; पाच भारतीय बचावले
कुवैती ध्वजांकित जहाज टार्गेट : सर्व खलाशी सुदैवाने सुरक्षित
वृत्तसंस्था/ मस्कत
होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये शुक्रवारी रात्री पुन्हा एका जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाला. या हल्ल्यादरम्यान जहाजावरील पाच भारतीय खलाशांना सुखरूप वाचवण्यात आले आहे, अशी घोषणा ओमानमधील भारतीय दूतावासाने शनिवारी केली. हे खलाशी कुवैती ध्वजांकित ‘एमटी काझिमा-3’ या जहाजावर तैनात होते. हे जहाज कच्चे तेल भरून आफ्रिकेकडे जात होते. तथापि, हा हल्ला कोणी केला याची माहिती अद्याप उघड झालेली नाही. फेब्रुवारीपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीतील हल्ल्यांमुळे 100 हून अधिक भारतीय खलाशी प्रभावित झाले असून, या हल्ल्यांमध्ये 11 भारतीय खलाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.
युके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सनुसार, (युकेएमटीओ) 1 ऑक्टोबर रोजी टँकरवर हल्ला झाला. या घटनेनंतर जहाजावर आग लागल्याचे वृत्त आहे. तथापि, जहाजावरील सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या अधिकृत माहितीनुसार, क्षेपणास्त्र कोणी डागले याची पुष्टी झालेली नाही. दूतावासाने ओमानच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने टँकरमधून पाच भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास मदत केली, असे भारतीय दूतावासाने सांगितले. तसेच बचावकार्यात सहकार्य केल्याबद्दल भारतीय दूतावासाने ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभारही मानले.
भारतीय दूतावास आणि स्थानिक संस्थांच्या सहकार्याने खलाशांच्या सुरक्षिततेविषयी आणि कल्याणाविषयी माहिती मिळवली जात आहे. गरज भासल्यास खलाशांची सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी भारतीय दूतावास आवश्यक ती पावले उचलत आहे. परदेशात काम करणाऱ्या भारतीय खलाशांची सुरक्षितता आणि कल्याण हे भारतासाठी प्राधान्याचे आहे. आखातातील प्रदेशात कार्यरत असलेल्या व्यावसायिक जहाजांवर 4,500 हून अधिक भारतीय खलाशी आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नुकतीच यासंबंधी अधिकृत माहिती जारी केली होती. जयस्वाल यांच्या म्हणण्यानुसार, सध्या पर्शियन आखातात सहा भारतीय ध्वज असलेली व्यापारी जहाजे आहेत. याव्यतिरिक्त, भारतासाठी माल वाहून नेणारी सहा परदेशी ध्वज असलेली जहाजे आहेत. या 12 जहाजांवर अंदाजे 163 भारतीय खलाशी आहेत. भारताचे नौवहन मंत्रालय या जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
युएन महासभेमध्ये खलाशांच्या सुरक्षेबद्दल चिंता
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी 26 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 81 व्या अधिवेशनात व्यापारी जहाजे आणि खलाशांवरील हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. समुद्रातील नवीन धोके जमिनीवरील विद्यमान संकटांना अधिक गंभीर करत आहेत. भारतीय खलाशांसोबतच इतर देशांतील खलाशांनीही आपले प्राण गमावले आहेत. हे पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे जयशंकर यांनी जागतिक व्यासपीठावर स्पष्ट केले होते. भारताच्या या भूमिकेनंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाज आणि टँकर्सवर हल्ले सुरूच आहेत.