केरळच्या मुख्यमंत्र्यांवर आणखीन एक आरोप
स्वप्ना सुरेश यांनी केला आरोप
वृत्तसंस्था /तिरुअनंतपुरम
केरळमधील सोन्याच्या तस्करीचे प्रकरण अद्याप थंडावलेले नसताना मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर नवे आरोप केले जात आहेत. मुख्यमंत्री विजयन यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या व्यावसायिक हितासाठी अनेक लोकांशी साटेलोटं करत होते असा आरोप स्वप्ना सुरेश यांनी केला आहे.
सप्टेंबर 2017 मध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मुलीच्या माहिती-तंत्रज्ञान व्यवसायासाठी शारजाह शासकाच्या अधिकृत केरळ दौऱयादरम्यान मदत मागितली होती असा दावा स्वप्ना यांनी एर्नाकुलम जिल्हा सत्र न्यायालयासमोर सादर एका प्रतिज्ञापत्रात केला आहे.
लवकरच आणखीन खुलासे
विजयन यांनी स्वप्ना सुरेश यांना ओळखत नसल्याचा दावा केला होता. यावर स्वप्ना यांनी आपण लवकरच प्रसारमाध्यमांद्वारे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानावरील माझी उपस्थिती आठवून देत नवे खुलासे करणार असल्याचे म्हटले आहे.
खासगी बैठकीची केली व्यवस्था
शारजाहच्या शासकाने केरळच्या स्वतःच्या दौऱयादरम्यान क्लिफ हाउसचा (मुख्यमंत्र्यांची अधिकृत निवासस्थान) दौरा केला. मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीदरम्यान त्यांच्या कुटुंबाने शारजाहच्या शासकला या व्यावसायिक हिताबद्दल माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या कन्या वीणा विजयन यांनी शारजाहमध्ये एक आयटी उद्योग सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु शारजाह शासकाने सहमती न दर्शविल्याने हा प्रकल्प बारगळला होता. मुख्यमंत्र्यांनी शारजाहच्या शासकाला एका खासगी बैठकीची विनंती केली होती असा दावा स्वप्ना यांनी केला आहे.
पैशांनी भरलेली बॅग
शारजाहच्या शासकाला प्रभावित करण्यासाठी पैशांनी भरलेली एक बॅग केरळमधील वाणिज्य दूतावास कार्यालयाचे तत्कालीन कर्मचारी पी.एस. सरित यांच्याकडून यूएईच्या वाणिज्य दूताला पाठविली होती. त्यानंतर सरितकडून ही बॅक सीमा शुल्क विभागाने जप्त केली होती असा दावा स्वप्ना यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.
माकपच्या दोन नेत्यांवर आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यासह माकपचे दोन नेते पी. श्रीरामकृष्णन आणि राज्याचे माजी मंत्री तसेच वरिष्ठ आमदार के.टी. जलील यांच्यावर स्वप्ना सुरेश यांनी गंभीर आरोप केले आहेत. विजयन यांनी स्वतःच्या कार्यालयाचा वापर शारजाह शासकाच्या माध्यमातून स्वतःच्या मुलीला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. तर श्रीरामकृष्णन यांनी युएईत एक शैक्षणिक संस्था सुरू करण्यासाठी मदत मागितली होती. जलील यांची मुंबईत एक बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप स्वप्ना यांनी केला आहे.