दिल्ली घोटाळ्याप्रकरणी आणखी एका आरोपीला जामीन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली अबकारी घोटाळ्यातील आरोपी अभिषेक बोइनपल्लीला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. याप्रकरणी बहुतांश सह-आरोपी जामिनावर आहेत असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. बोइनपल्ली हा यापूर्वी अंतरिम जामिनावर बाहेर होता, आता न्यायालयाने त्याला नियमित जामीन मंजूर केला आहे. हैदराबादचा रहिवासी असलेल्या अभिषेकला ऑक्टोबर 2022 मध्ये अटक करण्यात आली होती.
सीबीआयने बोइनपल्लीला अटक केली होती. नंतर ईडीने त्याला ताब्यात घेतले होते. बोइनपल्ली हा रॉबिन डिस्टिलरीजचा माजी संचालक असून दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी तो मध्यस्थ होता असे ईडीचे म्हणणे आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने नवे अबकारी धोरण लागू केली होती. त्यापूर्वी दिल्लीत मद्यविक्रीची 864 दुकाने होती, ज्यातील 475 सरकारी होती. परंतु नव्या धोरणाच्या अंतर्गत सरकार मद्यविक्रीच्या व्यवसायातून पूर्णपणे बाहेर पडले आणि हा व्यवसाय खासगी क्षेत्राला सोपविण्यात आला होता.