आत्मघाती हल्लेखोराचा आणखी एक साथीदार गजाआड
दिल्ली स्फोटप्रकरणी एनआयएची कारवाई : आतापर्यंत सात दहशतवाद्यांना अटक, तपासाला गती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आत्मघाती बॉम्बर डॉ. उमर नबीचा सहकारी शोएबला अटक केली आहे. शोएब हा फरिदाबादमधील धौज गावचा रहिवासी आहे. तो अल-फलाह विद्यापीठात वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर दहशतवादी उमरला रसद पुरवण्यात मदत केल्याचा आणि स्फोटापूर्वी उमर राहत असलेल्या नूह येथे एक खोली भाड्याने घेतल्याचा आरोप आहे. शोएबच्या अटकेमुळे या हाय-प्रोफाइल प्रकरणात अटक झालेल्यांची एकूण संख्या सात झाली आहे.
एनआयएने दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. याचदरम्यान डॉ. उमर नबीचा आणखी एक सहकारी शोएब तपास यंत्रणांच्या जाळ्यात सापडला आहे. यापूर्वी अटक केलेल्या डॉ. मुझम्मिल शकील याने दिलेल्या माहितीनंतर, एनआयए आता दहशतवादी मॉड्यूलमध्ये सहभागी असलेल्या डॉ. आदिल अहमद आणि डॉ. शाहीन सईद यांना चौकशीसाठी अल-फलाह विद्यापीठात नेणार आहे. उमर नबीचा जुना मित्र आदिल याच्या निवेदनानुसार फरिदाबादच्या आसपासच्या मुस्लीम लोकवस्ती असलेल्या फतेहपुरा तगा आणि धौज गावांमध्ये स्फोटके गोळा करण्याचा विचार मांडण्यात आला होता. आदिलच्या अटकेनंतरच इतर डॉक्टरांची नावे आणि स्फोटके कुठे आहेत हे उघड झाले.
सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. शाहीन सईद हिला या दहशतवादी नेटवर्कमध्ये महत्त्वाची भूमिका देण्यात आली होती. तिने विद्यापीठात भरती आणि ब्रेनवॉशिंग ऑपरेशन्स केल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांचे अधिकारी आता शाहीनला बैठकीच्या ठिकाणाची आणि तिच्या वाहनात लपवलेल्या शस्त्रांची माहिती गोळा करण्यासाठी विद्यापीठात आणणार आहेत.
चौकशीदरम्यान मुझम्मिल शकीलने जानेवारी-फेब्रुवारी 2023 मध्ये लक्ष्मी बीज भंडार आणि मदन बीज भंडार सारख्या दुकानांमधून अमोनियम नायट्रेट खरेदी केले असल्याची माहिती एनआयएला दिली. तपास यंत्रणा आता विद्यापीठातील दहशतवादी नेटवर्कमधील अन्य संशयितांचा शोध व तपास करत आहे. अटकेत असलेल्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवून त्यांनाही ताब्यात घेण्यासाठी अधिकारी सरसावले आहेत.