‘अनोरा’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह पाच ऑस्कर
अॅड्रियन ब्रॉडी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर मिकी मॅडिसन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
वृत्तसंस्था/ लॉस एंजेलिस
लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित 97 वा अकादमी पुरस्कार सोहळा नुकताच रंगतदार वातावरणात पार पडला. या समारंभात सर्व 23 श्रेणीतील ऑस्कर विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या वर्षी ‘अनोरा’ या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाने वर्चस्व गाजवले. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह पाच ऑस्कर जिंकले. ‘द ब्रुटालिस्ट’ चित्रपटासाठी अॅड्रियन ब्रॉडीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. तर ‘अनोरा’ चित्रपटासाठी मिकी मॅडिसनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. 97 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ‘द ब्रुटालिस्ट’ या चित्रपटातील अभिनेता अॅड्रियन ब्रॉडीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये ‘अनोरा’ चित्रपटाचे दिग्दर्शक शॉन बेकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘अनोरा’ या चित्रपटाने एकंदर सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट संपादन, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले आहेत.