अनोखा ‘हेरसेतू’
सेतू किंवा ब्रिज आपल्या नित्य परिचयाचा आहे. आपल्या परिसरात किंवा गावात असे सेतू असू शकतात. त्यांना विविध नावे असतात. काही नावे अनोख्या प्रकारची आणि वैशिष्ट्यापूर्ण असतात. तर काही नावे इतिहासात घडलेल्या काही संस्मरणीय घटनांवरुन पडलेली असतात. जर्मनीची राजधानी बर्लीन येथील हवेल या नदीवर असाच एक सेतू आहे. तसा तो फार मोठा किंवा नावाजलेले आहे असे नव्हे. त्याचे नाव ‘गेनिके ब्रिज’ असे आहे. पण त्याची जी ओळख आहे, ती अनोखी आहे. तो हेरांचा सेतू म्हणून जगात प्रसिद्ध आहे.
त्याला अशी ओळख का मिळाली, याचे कारण अद्भूत आहे. 17 व्या शतकात हा सेतू लाकडाचा होता. त्याचा उपयोग अधिक प्रमाणात शिकारी लोकांकडून होत असे. ते या सेतूवरुन स्टॉलपेच्या वनांमध्ये शिकारीला जात असत. 20 व्या शतकात वाहतूक वाढल्याने त्याच्यास्थानी लोखंडी सेतू स्थापन करण्यात आला.
दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचे विभाजन झाले. त्यानंतर या पुलाच्या एका भागावर पूर्व जर्मनीचे, तर दुसऱ्या भागावर पश्चिम जर्मनीचे नियंत्रण आले. त्यानंतर तो सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी बंद झाला. त्याचा उपयोग केवळ प्रतिष्ठित कैद्यांच्या देवाणघेवाणीसाठी करण्यात येऊ लागला. या ‘हाय प्रोफाईल’ कैद्यांमध्ये गुप्तहेरांचा समावेश अधिक प्रमाणात असे. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची विभागणी अमेरिकेचा भांडवलदारी गट आणि रशियाचा साम्यावादी गट अशी झाली होती. दोन्ही गट एकमेकांविरोधात मोठ्या प्रमाणात हेरगिरी करीत. जर्मनीचे दोन्ही भाग या हेरगिरीचे अग्रस्थान होते. त्यामुळे दोन्ही जर्मनींमध्ये हेरांची मोठ्या प्रमाणात धरपकड होत असे आणि कालांतराने त्यांची देवाणघेवाणही होत असे. ती प्रामुख्याने या सेतूवरुन होत असल्याने याला ‘हेरसेतू’ अशी ओळख मिळाली. अशा प्रकारे ओळख असणारा हा जगातील एकमेव सेतू आहे.