वार्षिक राशीभविष्य २०२५ : वृषभ
वृषभ ही राशिचक्रातील दुसरी रास. साहित्य व कलासक्त असून महाकंजूस व उधळ्या ही दोन्हीही टोके आहेत. अतिसंवेदनशील असून कल्पनाविलासात रमतात. जिज्ञासू असल्याने अध्यात्म, मानसशास्त्र व भावनांविषयी जाणून घेण्यात तत्पर असतात. नवनवीन विचारांची शिदोरीच जणु मेंदूत सुरू असते. गरजुंना मदत करताना आत्मिक समाधान मानतात. संवादकौशल्य उत्तम असल्याने आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडण्यात निपुण आतात. साध्या व सरळ स्वभावाची व्यक्ती म्हणून समाजात ओळख असते.
तुमचे व्यक्तिमत्व सहानुभूती आणि आदरातिथ्य यांनी भारलेले आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या भेटीचा आनंद होईल, यासाठी तुम्ही प्रयत्नशील असता. आवडीनिवडी सुसंस्कृत असून उत्तम दर्जाचे साहित्य व कला तुम्हाला मनापासून आवडते. पैशाच्या बाबतीत काही वेळा तुम्ही हात आखडता घेता आणि काही वेळा उधळपट्टीही करता. तुमच्यावर एखाद्याचा पटकन प्रभाव पडतो, हा तुमचा कच्चा दुवा आहे. किंबहुना तुम्ही जे ऐकता त्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता. विवेकशून्य व्यक्तींना तुमच्या स्वभावातील हा धागा चटकन समजतो आणि याचा फायदा उचलण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे नेहमी सतर्क राहा आणि मित्र होऊन कोणी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या फोलपणाला बळी पडू नका. तुम्ही कल्पनेच्या जगात जगता. अतिसंवेदनशील आहात. तुमच्यापैकी अनेकांना न्यूनगंड असतो. अत्यंत छोट्याशा बाबीमुळेही घोर अपमान झाल्यासारखे वाटते. ज्या ठिकाणी चटकन विचार करून निर्णय घेणे आवश्यक असते, ते क्षेत्र तुमच्यासाठी योग्य असेल. तणावापासून सावध राहा. मानसिक समाधान देणारे छंद आवडतात आणि विविध कला तुम्हाला अधिक आवडतात. आर्थिक बाबतीत नशीबवान असाल, भरपूर संपत्ती जमवाल. शेअरबाजारात पैसे गुंतवताना तुम्ही काळजी घ्याल आणि तुम्ही उद्योग किंवा व्यवसायामध्ये गुंतवणूक कराल.
तुमचे एका शब्दात वर्णन करायचे झाले तर संशोधक हा शब्द योग्य ठरेल, कारण तुमचा स्वभाव जिज्ञासू आहे. अध्यात्म, मानसशास्त्र आणि भावनांविषयी अधिकाधिक जाणून घेण्यास तुम्ही नेहमी तत्पर असता. ज्ञान आणि अनुभव मिळवणे हा तुमचा एक उद्देश असतो. तुमची बुद्धी चौकस आहे. तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टी समजून घेऊ शकता. तुमचा स्वभाव विनम्र, सौम्य, चैतन्यमय, मित्रत्वाचा आणि उत्साही आहे. तुमचा मेंदू नेहमी सक्रीय असतो आणि नवनवीन विचार नेहमी तुमच्या डोक्यात येत असतात. यामुळे तुम्हाला नवीन लोकांना भेटण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक शांती मिळते. तुमचे विचार हे न्याय्य आणि नि:पक्षपाती आहेत. तुमचे संवादकौशल्य उत्तम आहे. व्यक्तिमत्त्वाची छाप पाडून तुम्ही दुसऱ्याला सहज प्रभावित करता. लोक तुमच्यावर सहज विश्वास ठेवतात.
ग्रहमान
वर्ष आरंभ ते 14 मेपर्यंत गुरु वृषभ म्हणजे तुमच्या राशीवरच आहे. पुढे तो आपल्या धनस्थानी म्हणजे मिथुन राशीतून भ्रमण करणार आहे. अल्पकाळासाठी म्हणजे 19 ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या कालावधीत गुरु कर्क राशीतून गोचर करणारा आहे. एकंदरीत पाहता या दोन्ही गुरूचे भ्रमण आपल्यासाठी सर्वोत्तम राहणार आहे. विशेष करून मेनंतर धनातील गुरु सर्व बाबतीत आपल्यासाठी यशदायक राहणार आहे. इच्छाप्राप्ती सुख लाभ करून देणारा गुरु राहणार आहे. वर्षभरासाठी विवाह इच्छुकांसाठी गुरुबळ उत्तम राहणार. तुम्ही तुमच्या कामातच व्यस्त राहाल, लघु मुदतीसाठी आर्थिक लाभ होऊ शकेल. मध्यम आणि दीर्घकालीन प्रकल्प सुरू करावेत
वर्षारंभ ते 29 मार्चपर्यंत शनी कुंभ राशीत राहणार आहे व पुढे तो मीन राशीत जाणार आहे. हा शनी आपल्यासाठी कर्मस्थान व लाभस्थानातून भ्रमण करणारा आहे. या दोन्ही शनीचे भ्रमण आपल्यासाठी अति शुभ राहणार आहे. या वर्षी शनी महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर राहणार आहे. शनी महाराजांमुळे पुष्कळशी कामे सहज होत जाणार आहेत. आर्थिक बळ लाभणार आहे. नोकरीत अधिकार मिळणार आहे. कोणत्याही गोष्टी सहजपणे होत जाणार आहेत. आपल्याला आपल्या कर्माचे फळ उपलब्ध होणार आहे.
वर्षारंभ ते 18 मेपर्यंत राहू मीन राशीला लाभस्थानात असून पुढे कुंभ राशीला दशमात येत आहे. केतू पंचमात असून पुढे सिंह राशीला चतुर्थात येत आहे. राहूची फळे आपल्यासाठी चांगली लाभणार आहेत. कामांमध्ये गती मिळणार असून शत्रूंवर नेहमी विजय मिळेल. वाहनसौख्य लाभणार असून कमी दर्जाच्या लोकांशी उद्योग बाबतीत संबंध येणार व लाभ होणार. चतुर्थस्थानातील केतू आपल्यासाठी थोडा अनिष्टकारक राहणार आहे. आपल्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार. दुसऱ्याचे दोष बाहेर काढण्यात वेळ वाया घालवू नका. मित्रमंडळींमध्ये अपमानाचे प्रसंग संभावतात. एकंदरीत 2025 हे वर्ष तुमच्यासाठी शुभ आनंदी लाभकारी व इच्छापूर्ती करणारे राहणार आहे.
नोकरदार
आरोग्याबाबत सजग असणे, आरोग्याची काळजी घेणे आणि गरजा पुरवणे यामुळे तुमची ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे वापरू शकता. कामाच्या ठिकाणी नेतृत्व स्वीकारण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात येईल. तुम्हाला आदर-सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होईल. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात समतोल साधाल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि अखेर तुम्हाला समृद्धी, उत्पन्न आणि लाभ मिळेल. स्पर्धेत आणि मुलाखतींमध्ये यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी, मित्र आणि कुटुंबीय यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचे नवे मार्ग तुम्ही शिकाल. संवाद कौशल्य विकसित केल्यामुळे, स्वत:शी व स्वत:च्या गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे या काळात चांगला मोबदला मिळवाल. नोकरीच्या ठिकाणची परिस्थिती नक्की सुधारेल. सहकाऱ्यांकडून हरप्रकारे मदत मिळेल. तुम्ही जमीन किंवा काही यंत्रांची खरेदी कराल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कारण या समस्यांचे भविष्यात गंभीर स्वरूपात रूपांतर होऊ शकते. अल्सर, संधीवात, मळमळ, डोक्याशी आणि डोळ्यांशी संबंधित तक्रारी, सांधेदुखी किंवा एखाद्या धातुमुळे होणारी जखम याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या मार्गात कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. परंतु, खच्चीकरण होऊ देऊ नका. तुमचा आत्मविश्वास तुमचे काम निभावून नेईल. सरकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे म्हणूनच या संदर्भात सतर्क राहा. सट्टेबाजारातील व्यवहार किंवा धोका पत्करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही. तुमच्या आप्तेष्टांसोबत आणि नातेवाईकांसोबत असलेल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. दैनंदिन आचरणाकडे लक्ष द्या. कुटुंबाच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकणार नाही.
स्त्री वर्ग
आपल्याला कौटुंबिक सौख्य लाभेल. स्वप्रयत्नांमुळे उत्पन्नात वाढ होईल. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. प्रवास करण्यास हा अत्यंत अनुकूल काळ आहे. खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील भागिदारी फलदायी ठरेल. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होता, तो बदल आता घडणार आहे. संवाद आणि वाटाघाटी यामुळे तुम्हाला नव्या संधी प्राप्त होतील. कामधंद्याच्या निमित्ताने केलेला प्रवास फलदायी ठरेल. नोकरी करत असाल तर कामाच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीत सुधारणा होईल. हा काळ विविध अंगांनी अनुकूल आहे. आजुबाजूचे वातावरण इतके चांगले आहे की, प्रत्येक समस्या आपोआप सोडविली जात आहे. घरचे व्यवहार एकदम सुरळीत सुरू राहतील. जबरदस्त इच्छा आणि ऊर्जा ही उच्च असेल. उच्चभ्रू वर्गाकडून मदत मिळेल, पत वाढेल आणि शत्रूंचा बिमोड होईल. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांच्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आजुबाजूला आल्हाददायक वातावरण असेल. पण या परिस्थितीत तुम्ही वस्तुस्थितीकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे आणि कोणतेही काम अपूर्ण ठेवता कामा नये. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबीचे सखोल अवलोकन करणे गरजेचे आहे. परदेशी संबंधांतून तुम्हाला फायदा होईल. आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. फारसा फायदा करून न देणाऱ्या कामात गुंतावे लागेल. कुटुंबात काही कुरबुरी होतील. शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. या वर्षी केवळ एक घटक टाळा तो म्हणजे अति-आत्मविश्वास. घरावर आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यविषयक तक्रारींवर अधिक खर्च होईल. कौटुंबिक नाती जपण्याकडे कल असू दे. तुमचे कच्चे दुवे शोधून त्यांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे मनस्ताप होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी वर्ग
विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूप अनुकूल असणार आहे. या राशीच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते त्यांच्या विषयांबद्दल सक्रिय राहतील. परीक्षेत चांगली कामगिरी कराल. शिकत असताना काही आव्हानांचा सामना करावा लागेल. परंतु संयमाने अभ्यासात सातत्य राखले तर शुभ परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हे वर्ष फारसे अनुकूल नाही.
राशी स्वरूप : बैल, राशीस्वामी : शुक्र, शुभवार : शुक्रवार, अशुभ वार : शनिवार, घात मास : मार्गशीर्ष, शुभ रंग : पांढरा व गुलाबी, भाग्यरत्न : हिरा, आराध्य देवता : श्री कुलदेवता