जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समितींचा समावेश :-मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, सचिव सुरेश काकाणी यांची माहिती
प्रतिनिधी/मुंबई :
राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा मंगळवारी निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. त्यानुसार, राज्यातील 12 जिह्यात निवडणुकांचा धुरळा उडणार असून 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांच्याकडून जाहीर करण्यात आला. 5 फेब्रुवारी रोजी मतदा आणि 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
आता केवळ 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत, उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांबाबत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यानंतर तारीख जाहीर करणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
या जिल्हापरिषदांचा समावेश :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी धाराशीव, लातूर यांचा समावेश आहे. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशी दोन मते द्यावी लागतील. निवडणुकीत ज्या जागा राखीव आहेत त्या जागेवर जातवैधता पडताळणी आवश्यक आहे.
12 जिल्हा परिषदांसोबतच 125 पंचायत समित्यांसाठी 1462 सदस्यांची निवडणूक घेण्यात येईल. त्यातील 431 जागा महिलांसाठी, 166 जागा अनुसुचित जातींसाठी आणि 38 जागा अनुसुचित जमातींसाठी राखीव असतील. मागास प्रवर्गासाठी 342 जागा राखीव असतील.
या निवडणुकीसाठी निवडणूक आयोग 1जुलै 2025 ची मतदार यादी वापरणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच या निवडणुकीचा प्रचार जिल्हा परिषद अधिनियमानुसार 24 तास आधी संपेल, असंही सांगण्यात आले.
आचारसंहिता लागू :
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. संबंधित क्षेत्रात ही आचारसंहिता लागू झाली असली तरी अन्य ठिकाणीदेखील संबंधित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही; परंतु नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक राहणार असल्याचेही सांगितले आहे.
राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड पूर्वलक्ष्यी प्रभावाने रद्द होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यक्रम
16 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान अर्ज स्वीकारणे
22 जानेवारी रोजी अर्जांची छाननी
27 जानेवारी, दुपारी 3 वाजेपर्यंत. : उमेदवारी माघारीची अंतिम मुदत
27 जानेवारी दुपारी 3.30 वाजेनंतर : निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी
5 फेब्रुवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत: मतदान होणार
-7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजल्यापासून. : मत मोजणी आणि निकाल