‘कॉन्ज्यूरिंग 4’ची घोषणा
हॉररपट ‘द कॉन्ज्यूरिंग’ हा चाहत्यांच्या सर्वात आवडीचा चित्रपट मानला जातो. वेरा फार्मिगा आणि पॅट्रिक विल्सन यासारख्या हॉलिवूड सुपरस्टारच्या अभिनयाने नटलेल्या या सुपर नॅचरल हॉरर थ्रिलर फ्रेंचाइजीने मागील काळात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. दीर्घकाळापासून ‘द कॉन्ज्यूरिंग 4’ वरून चर्चा सुरू आहे. अखेर द कॉन्ज्यूरिंगचा अंतिम भाग कधी येणार हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. याचदरम्यान निर्मात्यांकडून द कॉन्ज्यूरिंग लास्ट राइट्सच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हॉलिवूडचे प्रसिद्ध प्रॉडक्शन हाउस न्यू लाइन सिनेमाच्या अंतर्गत द कॉन्ज्यूरिंग पार्ट 4 ची निर्मिती केली जात आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. वेरा फार्मिगा आणि पॅट्रिक विल्सन यांच्या जोडीने द कॉन्ज्यूरिंगद्वारे प्रेक्षकांचे यापूर्वी भरपूर मनोरंजन केले आहे. मागील पार्ट्सच्या तुलनेत द कॉन्ज्यूरिंग 4 अधिक भीतीदायक असेल असा कयास सोशल मीडियावर वर्तविला जात आहे. यापूर्वी द कॉन्ज्यूरिंग हॉरर चित्रपट फ्रेंचाइजीचे तीन पार्ट्स प्रदर्शित झाले आहेत. या फ्रेंचाइजीचे तिन्ही भाग यशस्वी ठरले आहेत. द कॉन्ज्यूरिंगची सुरुवात 2013 साली झाली. यानंतर 2016 मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आणि 2021 मध्ये द कॉन्ज्यूरिंग 3 ने प्रेक्षकांची मने जिंकली होती.