For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहारमध्ये महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा

06:51 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिहारमध्ये महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा
Advertisement

आरजेडी 26, काँग्रेस नऊ जागांवर लढणार : डाव्या पक्षांना पाच जागा

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारमधील विरोधी पक्षांच्या महाआघाडीने शुक्रवारी जाहीर केले असून राज्यातील लोकसभेच्या 40 जागांपैकी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) 26 आणि काँग्रेस 9 जागा लढवणार आहे. त्याचबरोबर डाव्या पक्षांना पाच जागा सोडण्यात आल्या असून त्यापैकी सीपीआय (एमएल) लिबरेशनला 3 तर, सीपीआय आणि सीपीआय-एम यांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे. मात्र, अलिकडेच आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणाऱ्या पप्पू यादव यांना योग्य न्याय मिळू न शकल्याने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Advertisement

बिहारमधील आरजेडीच्या नेतृत्वाखालील महागठबंधनाने शुक्रवारी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. राजदचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार मनोज कुमार झा, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी पत्रकार परिषदेत जागांसंबंधी माहिती दिली. याप्रसंगी सीपीआय(एमएल) लिबरेशन, सीपीआय आणि सीपीआय-एमचे राज्यस्तरीय नेतेही उपस्थिते होते. लालूप्रसाद यांच्या पक्षाने राज्यातील 40 संसदीय मतदारसंघांपैकी जवळपास दोन तृतीयांश जागांवर दावा करत मित्रपक्षांना धक्का दिला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या एका दिवसानंतर जागावाटप जाहीर करण्यात आले.  उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जाणार असून आम्ही एकसंधपणे लढून एनडीएच्या उमेदवारांना पराभूत करू, असा दावाही पत्रकार परिषदेत करण्यात आला.

पप्पू यादवांचे काय होणार?

महाआघाडीने जागावाटपाची घोषणा केल्यानुसार काँग्रेसने दावा केलेल्या अनेक जागा आरजेडीच्या खात्यात गेल्या. जागावाटप फॉर्म्युल्यानुसार, आरजेडीने काँग्रेसकडून पूर्णियाची जागा हिसकावून घेतली आहे. काँग्रेसने गेल्या आठवड्यात पूर्णियाचे तीन वेळा माजी खासदार असलेले पप्पू यादव यांना पक्षात घेतले होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आपल्याला परिणामकारक आश्वासन दिल्याचा दावा करत यादव यांना या जागेवरून तिकीट मिळण्याची आशा होती. आता पप्पू यादव यांची पुढची वाटचाल काय असेल हे पाहणे निर्णायक ठरणार आहे. जागावाटपाचे सूत्र ठरल्यानंतर पप्पू यादव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपण पूर्णियातून लढणार असल्याचे स्पष्ट केले असून 4 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या गया, औरंगाबाद, जमुई आणि नवादा या चार जागांसाठी आरजेडीने आपले उमेदवार उभे केले होते. शिवाय, सीपीआय आणि सीपीआय(एम) यांनी बेगुसराय आणि खगरिया जागांसाठी आधीच त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. जागावाटपानुसार डाव्या पक्षांना 5, आरजेडीला 26 आणि काँग्रेसला 9 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 9 जागा मिळणे काही कमी नाही, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. त्याचवेळी काँग्रेसमध्ये नव्याने दाखल झालेल्या पप्पू यादव यांच्यासाठी जागावाटप हा मोठा धक्का मानला जात आहे.

पक्षनिहाय मतदारसंघ

लालू यादव यांनी महाआघाडीत किशनगंज, कटिहार, मुझफ्फरपूर, सासाराम, पटना साहिब, समस्तीपूर, भागलपूर, पश्चिम चंपारण आणि महाराजगंज या जागा काँग्रेसला दिल्या आहेत. या अशा जागा आहेत जिथे काँग्रेससाठी उमेदवार शोधण्यापासून त्यांचा प्रचार करणे आणि त्यांना जिंकणे हे कठीण आव्हान आहे. त्याचवेळी 26 जागांवर आरजेडी निवडणूक लढवणार असून तेथे पक्षाचे स्थान मजबूत आहे. गया, नवादा, जहानाबाद, औरंगाबाद, वाल्मिकीनगर, पाटलीपुत्र, मुंगेर, जमुई, बांका, अररिया, पूर्व चंपारण, शिवहर, सीतामढी, वैशाली, सारण, सिवान, गोपालगंज, उजियारपूर, दरभंगा, मधुबनी, झांझारपूर सुपौल, मधेपुरा, अररिया, हाजीपूर आणि पूर्णिया या जागा आरजेडीच्या वाट्याला आल्या आहेत.

Advertisement
Tags :

.