Satara News : नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत जाहीर; साताऱ्यात राजकीय हालचालींना वेग
सातारा जिल्ह्यात सर्वसाधारण नगराध्यक्ष पदांमुळे इच्छुकांत उत्साह
कराड : राज्यातील २४७ नगरपालिका व १४७ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत सोमवारी मंत्रालयात पार पडली. या सोडतीमध्ये सातारा जिल्ह्यात आठ शहरांचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण झाले असल्याने इच्छुक सुखावले आहेत. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत पार पडली. या सोडतीकडे जिल्ह्यातील नगरपालिकांचे लक्ष लागले होते.
सातारा, कराड, फलटण, वाई, महाबळेश्वर या नगरपालिकांचे नगराध्यक्ष पद खुले झाले आहे. त्यामुळे या शहरांमध्ये चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. तर पाचगणी व मलकापूर पालिका अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. रहिमतपूर व म्हसवडला सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. सातारा, कराडचे नगराध्यक्ष पद दीर्घ कालावधीनंतर खुले झाले आहे. याशिवाय निवडणूक होऊ घातलेल्या मेढ्याचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. तर पाटण, लोणंदचे पुढील नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. खंडाळा, बडूज, कोरेगावचे पुढील नगराध्यक्षपद खुले झाले आहे.
नगराध्यक्ष पद खुले झालेल्या शहरांमध्ये निवडणुका चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व असून त्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
उद्या प्रभागांचे आरक्षण
जिल्हयातील निवडणुका होऊ घातलेल्या ९ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची प्रभागांची आरक्षण सोडत बुधबार ८ रोजी त्या शहरांत आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरसेवकांना प्रभागांच्या आरक्षणाचे वेध लागले आहेत. प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर आघाड्या व राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.