भारतीय महिला क्रिकेट संघांची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यामध्ये कसोटी, वनडे आणि टी-20 मालिका खेळविल्या जाणार आहेत. या तिन्ही मालिकांसाठी भारतीय क्रिकेट निवड समितीने शुक्रवारी तीन विविध संघ जाहीर केले. जेमिमा रॉड्रिग्ज आणि पूजा वस्त्रकर यांचा भारतीय संघामध्ये समावेश झाला असला तरी मालिका सुरु होण्यापूर्वी त्यांच्या तंदुरूस्तीची चाचणी घेतली जाईल. सलामीची फलंदाज प्रिया पुनियाचे भारतीय वनडे संघात पुनरागमन झाले आहे. क्रिकेटच्या या तिन्ही प्रकारातील होणाऱ्या मालिकांसाठी भारताचे नेतृत्व हरमनप्रित कौरकडे सोपविण्यात आले आहे. उभय संघामध्ये एकमेव कसोटी, 3 सामन्यांची टी-20 मालिका, 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.
भारतीय महिला निवड समितीच्या बैठकीमध्ये हरमनप्रित कौरकडे कर्णधरपदाची जबाबदारी तर स्मृती मानधनाकडे उपकप्तानपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. जेमिमा रॉड्रिग्ज आणि पूजा वस्त्रकर यांचा संघामध्ये समावेश करण्यात आला असला तरी त्यांच्या तंदुरुस्तीची समस्या महत्त्वाची राहिल. सलामीची फलंदाज प्रिया पुनियाने आपला शेवटचा सामना केल्या जुलैमध्ये बांगलादेश विरुद्ध मीरपूर येथे खेळला होता. त्यानंतर तिचे या आगामी मालिकेसाठी संघात पुनरागमन झाले आहे. मात्र तिला कसोटी सामन्यासाठी निवडण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे डावखुरी फिरकी गोलंदाज साईका इशाकीला राखिव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. तब्बल एक दशकानंतर उभय संघात विविध मालिका पहिल्यांदाच खेळविल्या जात आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या या भारत दौऱ्यातील वनडे मालिका बेंगळूरमध्ये आयोजित केली आहे. तर एकमेव कसोटी आणि टी-20 मालिका चेन्नईमध्ये खेळवली जाईल. 2014 च्या नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघामध्ये कसोटी सामना खेळविला जात आहे. आयसीसीच्या महिलांच्या 2022-2025 दरम्यानच्या चॅम्पियनशिप स्पर्धा अंतर्गत ही मालिका राहिल.
भारतीय वनडे संघ : हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा छेत्री, डी. हेमलता, राधा यादव, आशा शोभना, श्रेयांका पाटील, सायका इशाक, पूजा वस्त्रकर, रेणुकासिंग ठाकूर, अरुंधती रे•ाr व प्रिया पुनिया.
भारतीय कसोटी संघ - हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, शुभा सतिश, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा छेत्री, दिप्ती शर्मा, स्नेह राणा, सायका इशाक, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकर, रेणुकासिंग ठाकूर, अरुंधती रे•ाr, मेघना सिंग व प्रिया पुनिया.
भारतीय टी-20 संघ - हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, डी. हेमलता, उमा छेत्री, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, सजना सजीवन, दिप्ती शर्मा, श्रेयांका पाटील, राधा यादव, अमनज्योत कौर, आशा शोभना, पूजा वस्त्रकर, रेणुकासिंग ठाकूर, अरुंधती रे•ाr.