For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोदरेज समूहाकडून विलगीकरणाची घोषणा

06:58 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोदरेज समूहाकडून विलगीकरणाची घोषणा
Advertisement

127 वर्षानंतर विभागणी : दोन गट स्वतंत्रपणे कार्य करणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

साबणापासून ते लॉकर पर्यंतच्या उद्योगांमध्ये कार्यरत असणारा गोदरेज उद्योग समूह तब्बल 127 वर्षानंतर दोन गटांमध्ये विभागला जाणार आहे. मंगळवारी उशीरा गोदरेज कुटुंबीयांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. यामध्ये एका गटाचे नेतृत्व आदी गोदरेज आणि त्यांचे भाऊ नादीर यांच्याकडे राहणार असून दुसऱ्या गटाचे नेतृत्व त्यांचे चुलत भाऊ जमशेद आणि बहिण स्मिता यांच्याकडे राहणार आहे.

Advertisement

आदी गोदरेज व कुटुंबिय

आदी आणि नादीर गोदरेज यांच्याकडे गोदरेज इंडस्ट्रीजचा ताबा राहणार आहे आणि यामध्ये पाच लिस्टेड कंपन्यांचा सहभाग असणार आहे. जमशेद गोदरेज यांच्याकडे गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुप (गोदरेज अँड बॉयस)यांचा ताबा असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे गोदरेज ट्रेडमार्कचा वापर दोन्ही कुटुंबीयांच्या समूहाला पुढील काळामध्ये करता येणार आहे. म्हणजेच याची मालकी दोन्ही गटाकडे राहणार आहे. गोदरेज इंडस्ट्रीजअंतर्गतचे नेतृत्व आदी गोदरेज हे करणार असून यांची तीन मुले तान्या, निसाबा आणि पिरोजशा आणि भाऊ नादिर यांचा यात समावेश आहे. सर्व गोदरेज इंडस्ट्रीज अँड असोसिएटेड कंपनीजचे नियंत्रण पाहतील. या गटामध्ये गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड, गोदरेज अॅग्रोवेट लिमिटेड, एस्टेक लाईफ सायन्सेस लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. गोदरेज इंडस्ट्रीजचे चेअरमन नादिर गोदरेज असणार आहेत. आदी यांचे 42 वर्षीय सुपुत्र पिरोजशा गोदरेज हे गोदरेज इंडस्ट्रीच्या कार्यकारी उपाध्यक्षपदी राहणार आहेत.

जमशेद कुटुंबियांकडे गोदरेज एंटरप्राइझेसचे नेतृत्व

गोदरेज एंटरप्राइजेस समूह अंतर्गत जमशेद गोदरेज हे मुख्य असणार असून या गटामध्ये बिगर लिस्टेड कंपन्यांचा समावेश आहे. एरोस्पेस, डिफेन्स, कुलूप, फर्निचर आणि घरगुती उत्पादने या गटात समाविष्ट झालेली आहेत. गोदरेज अँड बायसचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष जमशेद गोदरेज हे असतील. त्यांची बहीण स्मिता यांची 42 वर्षीय मुलगी न्यारीका होळकर ही कार्यकारी संचालक असेल.

 तीन वर्षापासून सुरु होती प्रक्रिया

गेल्या तीन वर्षापासून समूह विभागणीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. आता विभागणी अंतिम झाली असून यानंतरच्या काळामध्ये कुटुंबातील सदस्य कंपनीतील हिस्सेदारी विक्री करून बाहेर पडतील. आदी आणि नादीर गोदरेज यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच गोदरेज अँड बॉयस या कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला होता. जमशेद हे सुद्धा जीसीपीएल आणि गोदरेज प्रॉपर्टीजच्या संचालक पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडले आहेत.

Advertisement
Tags :

.