ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंच्या केंद्रीय करारांची घोषणा
वृत्तसंस्था, सिडनी
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2026-27 हंगामासाठी राष्ट्रीय करारांची यादी जाहीर केली असून यामध्ये 18 महिला क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत (एमओयू), 15 ते 18 महिला खेळाडू केंद्रीय करारासाठी पात्र ठरतात. जलद गोलंदाज क्लोई एन्सवर्थ आणि लुसी हॅमिल्टन यांना त्यांचे पहिले राष्ट्रीय करार मिळाले आहेत. तर निकोला कॅरी हिचा समावेश या यादीत कायम आहे. तिला ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान करारात बढती मिळाली होती. अॅलिसा हिली (निवृत्त), टायला व्लामिंक आणि टेस फ्लिंटॉफ यांचे गेल्या हंगामातील करार मात्र नूतनीकरण करण्यात आले नाहीत.
2026-27 च्या करार काळातील ऑस्ट्रेलियाची पहिली मोठी मोहीम म्हणजे इंग्लंडमध्ये होणारा टी-20 विश्वचषक असेल. गेल्या दोन आयसीसी स्पर्धांच्या उपांत्य फेरीत अनपेक्षित पराभव पत्करावे लागल्यामुळे या स्पर्धेत विजेतेपद पटकावण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ अत्यंत उत्सुक असेल.
हा सलग होणाऱ्या चार प्रमुख टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धांपैकी पहिला टप्पा असेल. यानंतर जून 2027 मध्ये श्रीलंकेत महिलांची पहिली टी-20 चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित केली जाईल आणि त्यानंतर 2028 मधील लॉस एन्जिलस ऑलिम्पिक व पाकिस्तानमध्ये होणाऱ्या 2028 चा टी-20 विश्वचषक पार पडेल.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या करारबद्ध महिला खेळाडू (2026-27): क्लोई एन्सवर्थ, डार्सी ब्राऊन, निकोला कॅरी, अॅश्ले गार्डनर, किम गार्थ, हेदर ग्रॅहम, लुसी हॅमिल्टन, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, फीबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिन्यू, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया व्होल, जॉर्जिया वेअरहॅम.