For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उमेदवारांची घोषणा

06:40 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
उमेदवारांची घोषणा
Advertisement

लोकसभा निवडणुकीचे मैदान निश्चित होण्यासाठी आवश्यक तिकीट वाटप व प्रमुख पक्षाचे विविध लोकसभा मतदार संघातील उमेदवार जाहीर होऊ लागले आहेत. नितीन गडकरी वगैरेंनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. येत्या दोन चार दिवसात निवडणुकीचे रिंगण पक्के करून प्रचारासाठी नेत्यांचे दौरे सुरू होतील. मुंबईचे शिवतीर्थ विविध पक्षांकडून, पाठोपाठ बूक झाल्याच्या वार्ता आहेत. या साऱ्या हालचालीत व डावपेचात महाराष्ट्रात विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात सांगली, इचलकरंजी, माढा, बारामती, सातारा अशा बहुतेक मतदार संघात व महाराष्ट्रात पेच निर्माण झाले आहेत. त्यामुळे तिकीट वाटप लांबणीवर पडते आहे. आघाडी आणि महायुतीतील घटक पक्ष एकमेकांना खाली खेचत आहेत. सांगली म्हणजे स्वर्गीय वसंतदादा पाटील व काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला  पण त्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला आहे. काँग्रेसला ही कृती पचनी पडलेली नाही. याचा या मतदार संघात आणि महाराष्ट्रातील वसंतदादा गटावर काय परिणाम होतो हे पहावे लागेल. इचलकरंजीत शेतकरी नेते राजू शेट्टी उभे राहणार आहेत. त्यांना महाआघाडीचा बाहेरून पाठींबा हवा आहे. पण शिवसेना त्यास राजी नाही. बारामतीची लढत प्रतिष्ठेची व लक्षवेधी आहे. तेथे पवार कुटुंबातच जुंपली आहे. शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांची ही लढत केवळ राज्यात नव्हे देशात चर्चेचा विषय बनली आहे. याच बारामतीत शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे जिंकू किंवा मरू या पवित्र्यात उतरले आहेत. अर्ज मागे घ्या असा त्यांच्यावर दबाव आहे पण, फाशी जाईन पण अर्ज माघारी घेणार नाही अशी घोषणा त्यांनी केली आहे. सातारा मतदारसंघ अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आला आहे. तेथे उमेदवार म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले त्यांना मान्य आहेत पण, चिन्ह घड्याळच हवे असा ताण आहे. राजे भाजपच्या चिन्हावर लढणार असे म्हणत आहेत. एकूणच तिकीट वाटप आणि महायुती, महाआघाडी समोरचे पेच संपलेले नाहीत. मोदी व भाजप हटाव अशी भूमिका घेऊन सरसावलेली इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष मोठमोठ्या वल्गना करत असला आणि एकास एक असे चित्र अपेक्षीत धरून चालला असला तरी तसे चित्र साकारेल असे वाटत नाही. इंडिया आघाडी म्हणजे कमजोर झालेला काँग्रेस पक्ष आणि विविध राज्यातील घराणेशाही केंद्रीत प्रादेशिक पक्ष यांचे सोयीपुरते संघटन आहे. भाजपाने गेल्या निवडणुकीत काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा दिली आणि काँग्रेसला पन्नास जागाही जिंकता आल्या नाहीत. यावेळी भाजपाने व एनडीएने ‘अबकी बार चारसौ पार’ असा नारा दिला आहे. बारामतीपासून काश्मिरपर्यंतची घराणेशाही मोडणार असा संकल्प केला आहे. भाजपाला विजयाचे दक्षिणव्दार खुले झाले तर चारशे पार शक्य होईल असा राजकीय पंडितांचा कयास आहे. कर्नाटक, आंध्र, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील व्यक्तिकेंद्रीत राजकारण उखडून काढायचे. घराणेशाही संपवायची असा भाजपाचा मुख्य कार्यक्रम आहे व तो लपून राहिलेला नाही. त्यातूनच इंडिया आघाडी साकारली आहे. पण, इंडिया आघाडीचे नितीशकुमार भाजपच्या तंबुत घुसले आहेत. दिल्लीचे आपचे केजरीवाल दारू पॉलिसी प्रकरणात तुरूंगात गेले आहेत. तेलंगणात चंद्रशेखर राव निष्प्रभ झाले आहेत. त्यांची सत्ता गेली आहे. त्यांची कन्या कविता मद्य घोटाळ्यात अटकेत आहे. आंध्रात चंद्राबाबू नायडू भाजपासोबत आहेत. ओरिसात बिजू जनतादल स्वतंत्र लढणार आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे भाजपा सोबत जाणार असे दिसते आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत रोज इंडिया आघाडीसाठी बैठका काढत असले तरी महाराष्ट्रात वंचित आघाडी काय भूमिका घेते यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबतची आपली युती तोडली आहे. ते महाआघाडीत आहेत का नाही हे स्पष्ट झालेले नाही. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे काय करतात हे महत्वाचे आहे. मराठा मतदारांनी शंभर टक्के मतदान करायचे पण, कोणत्याही पक्षाच्या सभेला, मेळाव्याला कामाला प्रचाराला जायचे नाही असे फर्मान त्यांनी काढले आहे. प्रकाश आंबेडकर, प्रकाश शेंडगे व मनोज जरांगे यांची तिसरी संयुक्त शक्ती निर्माण करण्याच्या हालचालीही होताना दिसत आहेत. त्यामुळे तिकीट कुणाला जाहीर होणार आणि मैदान कसे रंगणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. देशभरात इंडिया आघाडी तिचे नेते, त्यांच्या भूमिका या नमनालाच घडाभर तेल जळले आहे. भाजपाने चारशे पार अशी घोषणा केली असली आणि काँग्रेसची यावेळी पन्नास पार अशी थट्टा उडवली जात आहे. भाजपातही अनेक मतदारसंघात तिकीट वाटपावरून नाराजी आहे. वाढती महागाई, बेरोजगारी हे प्रश्न तीव्र बनले आहेत. अनेक विद्यमान खासदारांचा संपर्क कमी पडलेला आहे. भाजपतही गटबाजीची किड लागली आहे. नितीन गडकरींनी केलेले काम आपले काम म्हणून अनेक उमेदवार स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. भाजपाला चारशे पार हे संख्याबळ गाठता येईल का यावर वाद आहेत. पण, राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यापासून शेअर बाजारातील अनेकजण भाजपाची सत्ता येणार असे सांगत आहेत. मोदी, भाजपा विरोधी बाकावर बसतील असे कुणीही छातीठोक सांगताना दिसत नाही. त्यामुळे विरोधकांचा विरोध, घर, वारस, घराणेशाही वाचवण्यासाठी सुरू आहे असे चित्र आहे. निवडणुकीत मतदानापर्यंत अनेक गोष्टी घडत असतात. भारतीय मतदार हुशार असला तरी भावनिक आहे. त्यामुळे तिकीटे कुणाला मिळतात किती रंगी लढत होते, प्रत्यक्षात कोण कुणाचे काम करते यावरच अनेक गोष्टी अवलंबून आहेत. तूर्त उमेदवार याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. आणि उमेदवार व इच्छुक श•t मारताना दिसत आहेत. घोडामैदान जवळ आले आहे आणि सर्व पक्ष, नेते, उमेदवार एकमेकांना आजमावत आहेत. एकमात्र आहे एकेकाळी दगडाला शेंदूर फासून किंवा पक्षाचे चिन्ह देऊन कुणालाही खासदार, आमदार करता येत असे. आता ते दिवस संपले आहेत. पक्ष धोरण, यंत्रणा, कार्यक्रम या जोडीला उमेदवारही चांगला द्यावा लागणार आहे. संसदेत जाणारा खासदार हा इंग्रजी, हिंदी बोलणारा, जाणणारा असावा त्याने संसदेत चांगले प्रतिनिधीत्व करावे अशी अपेक्षा असली तरी निवडणुकीत निवडून येणारा हाच निकष महत्त्वाचा मानला जातो आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.