केंद्र सरकारकडून 24 संसदीय समित्यांची घोषणा
भाजपला 11 तर काँग्रेसला 4 समित्यांचे अध्यक्षपद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रातील मोदी सरकारने 24 संसदीय समित्या स्थापन केल्या आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना संरक्षण व्यवहार समितीचे सदस्य करण्यात आले आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांना परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष, तर राम गोपाल यादव यांना आरोग्य समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. याशिवाय भाजप खासदार राधामोहन सिंह यांची संरक्षण व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप 11 समित्यांचे अध्यक्षपद भूषवणार असून काँग्रेसकडे चार समित्यांची धुरा असणार आहे. मात्र, सोनिया गांधी यांचे नाव कोणत्याही समितीत समाविष्ट करण्यात आलेले नाही.
भाजपचे नेते राधामोहन दास अग्रवाल यांना गृह मंत्रालयाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. भाजप खासदार भर्तृहरी महताब यांच्याकडे अर्थविषयक संसदीय समितीची कमान आली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याकडे महिला, शिक्षण, युवा आणि क्रीडाविषयक संसदीय समितीची कमान मिळाली आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांना संपर्क आणि आयटी समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. तर कंगना रणौत यांना या समितीचे सदस्य बनवण्यात आले आहे. रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणाऱ्या अऊण गोविल यांना परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य बनवण्यात आले आहे. भाजप नेते सी. एम. रमेश यांची रेल्वे व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात 2024-25 या वर्षासाठी 24 विभागीय संसदीय स्थायी समित्यांची गुऊवारी रात्री उशिरा स्थापना करण्यात आली. प्रत्येक समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सदस्यांचा समावेश असतो. काँग्रेसने केंद्र सरकारकडे सहा स्थायी समित्यांचे अध्यक्षपद मागितले होते, मात्र त्यांना चार प्रमुख पॅनलला अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यात परराष्ट्र, शिक्षण, कृषी आणि ग्रामीण व्यवहार या समित्यांचा समावेश आहे.
तृणमूल आणि द्रमुकने प्रत्येकी दोन समित्यांचे अध्यक्षपद भूषवले आहे. जेडीयू, टीडीपी, सपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार) यांना प्रत्येकी एका समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. प्रत्येक विभागीय संसदीय स्थायी समितीमध्ये 31 सदस्य असतात, त्यापैकी 21 लोकसभेतून आणि 10 राज्यसभेतून निवडले जातात. या सर्व समित्यांचा कार्यकाळ एक वर्षापेक्षा जास्त नसतो.