नावे जाहीर करा, निलंबित करा,न्यायालयीन चौकशी आयोग नेमा
काँग्रेसच्या सरकारकडे तीन मागण्या : सरकार, पोलिसांवर सोडले टीकास्त्र
पणजी : ‘कॅश फॉर जॉब’ या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी असून पूजा नाईक हिने घेतलेल्या मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंता यांची नावे सरकारने प्रथम जाहीर करावीत तसेच त्या सर्वांना त्वरित निलंबित करण्यात यावे व तपास कामासाठी न्यायालयीन चौकशी आयोग नेमण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. हा घोटाळा रु. 500 कोटीपेक्षा जास्त रकमेचा असून सदर विषय काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्तरावर नेणार आहे तसेच संसदेतही त्याचा जाब विचारणार असल्याचे पक्षाने नमूद केले आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रसार माध्यम प्रमुख पवना खेरा यांनी काल बुधवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील मागणी व निवेदन करून सांगितले की निती आयोगाच्या आकडेवारीनुसार गोवा हे बेकारांची सर्वाधिक संख्या असणारे राज्य असून त्यांच्याकडून लाखो, करोडो रुपये उकळून नोकऱ्यांचा लिलाव केला जातो हे लांच्छानास्पद आहे.
एवढा मोठा घोटाळा झालेला असताना ईडी यंत्रणा झोपली आहे काय ? अशी विचारणा काँग्रेसचे गोवा प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. चौकशीचे नाटक बंद करा आणि घोटाळ्यात गुंतलेल्यांची नावे जनतेसमोर आणावित असेही ते म्हणाले. घोटाळ्यात कोण सामील आहेत ते जनतेलाही कळले पाहिजे, असेही पाटकर यांनी नमूद केले. गोवा राज्यात ट्रीपल इंजिन सरकार आहे. वर्ष 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 50,000 नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते तर वर्ष 2022 च्या निवडणुकीत 10,000 नोकऱ्या मिळतील म्हणून जाहीर केले होते. प्रत्यक्षात नोकऱ्या किती दिल्या ? याची श्वेतपत्रिका आणि तपासणी याची माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी खेरा यांनी केली आहे. जलदगती न्यायालयामार्फत या प्रकरणाचे तपासकाम झाले पाहिजे असे ते म्हणाले. घोटाळ्यातील मंत्री, सरकारी अधिकारी यांची नावे देऊनही पोलिस काहीच कारवाई करीत नाहीत ते पोलिस कसले ? असा प्रश्न पाटकर यांनी केला. ते मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वाट पहातात काय ? असेही ते म्हणाले. गोवा प्रसारमाध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर त्यावेळी उपस्थित होते.