Kolhapur News: उद्योजकांना 30 कोटी 90 लाखांचे अर्थसहाय्य, व्याज परताव्यासाठी 19 हजार 740 लाभार्थी मंजूर
जिह्यातील या योजनेतील कामकाज राज्यात अग्रस्थानी आहे
कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत कोल्हापूर जिह्यात कोट्यावधी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित केले आहे. कोल्हापूर जिह्यात महामंडळामार्फत लाभार्थ्यांना व लाभार्थी गटांना एकूण रु. 30 कोटी 90 लाख 10 हजार एवढ्या रकमेचे अर्थसहाय्य केले आहे.
जिह्यातील या योजनेतील कामकाज राज्यात अग्रस्थानी आहे. या योजनेअंतर्गत जिह्यातील आकडेवारी लक्षणीय आहे एकूण 47 हजार 485 अर्जदारांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 22 हजार 577 जणांना पात्रता प्रमाणपत्र मिळाले. 20 हजार 327 लाभार्थ्यांचे बँक कर्ज मंजूर झाले आहे.
महामंडळाकडून व्याज परताव्यासाठी 19740 लाभार्थी मंजूर झाले असून, 19090 लाभार्थ्यांचा व्याज परतावा सुरू झाला आहे. बँकांनी वितरित केलेली एकूण कर्ज रक्कम 1850 कोटी 64 लाख 49 हजार 451 रुपये आहे. आजपर्यंत महामंडळाने 223 कोटी 11 लाख रुपये इतका मोठा व्याज परतावा केला आहे.
गट कर्ज व्याज परतावा योजना सामूहिक प्रयत्नांना बळ सामूहिक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे या योजनेतर्गत पाच व्यक्तींच्या गटाला किमान रु. 10 लाख ते कमाल रु. 50 लाखांपर्यंतच्या कर्ज मर्यादेवर व्याज परतावा दिला जातो. या योजनेत अलीकडे काही महत्त्वाच्या शिथिलता आणल्या आहेत.
दोन व्यक्तींसाठी कमाल रु. 25 लाख मर्यादित कर्ज. तीन व्यक्तींसाठी कमाल रु. 35 लाख मर्यादित कर्ज. चार व्यक्तींसाठी कमाल रु. 45 लाख मर्यादित कर्ज. पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रु. 50 लाखांवरील कर्जावर व्याज परतावा महामंडळ करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शेती पूरक व्यवसाय करणाऱ्यांना आणि महिला बचतगटांकरीता असलेली कमाल वयोमर्यादेची अट या योजनेतून वगळण्यात आली आहे.
या योजनेची सद्यस्थिती देखील आश्वासक आहे एकूण 331 गट अर्ज करत आहेत. 99 गटांना पात्रता प्रमाणपत्र मिळाले आहे. 152 लाभार्थी गटांचे बँक कर्ज मंजूर झाले आहे. 146 गटांचा व्याज परतावा सुरू झाला असून, आजपर्यंत 4 कोटी 66 लाख 13 हजार 297 रुपये एवढा व्याज परतावा झाला आहे. या योजनेअंतर्गत लाभ तसेच अधिक माहितीसाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कोल्हापूर जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा