For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अन्नभाग्य योजना रखडली

11:25 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
अन्नभाग्य योजना रखडली
Advertisement

लाभार्थी प्रतीक्षेत, योजना विस्कळीत

Advertisement

बेळगाव : दोन ते तीन महिन्यांपासून गॅरंटी योजनेतील अन्नभाग्यचा निधी रखडला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे. सरकारकडून योजना सुरळीत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे अन्नभाग्य, गृहलक्ष्मी योजनेचा निधी रखडला आहे. सरकारने मागील वर्षापासून गॅरंटी योजना लागू केल्या आहेत. यामध्ये गृहलक्ष्मी, अन्नभाग्य, शक्ती, विद्यानिधी आदींचा समावेश आहे. मात्र गृहलक्ष्मी आणि अन्नभाग्य योजना विस्कळीत झाली आहे. लाभार्थ्यांना दोन ते तीन महिन्यापासून निधी मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रति व्यक्ती 170 रुपये दिले जातात. सरकारने या योजनेंतर्गत 10 किलो तांदूळ देण्याचे निश्चित केले होते. मात्र पुरेसा तांदूळ साठा उपलब्ध होत नसल्याने तांदळाऐवजी निधी दिला जात आहे. मात्र दोन महिन्यापासून हा निधी प्रलंबित पडला आहे. डीबीटीद्वारे या योजनेतील रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे लाभार्थी बँक खात्यात रक्कम जमा झाली का? हे पाहण्यासाठी हेलपाटे मारू लागले आहेत. मात्र सरकारकडूनच निधी दिला जात नसल्याने बँक खात्यावर कसा जमा होणार? त्यामुळे लाभार्थ्यांना निराशेने माघारी परतावे लागत आहे. गॅरंटी योजना विस्कळीत होऊ लागल्याने या योजना बंद पडणार का? अशी दबक्या आवाजात चर्चा होऊ लागली आहे.

Advertisement

गृहलक्ष्मी विस्कळीत

गृहलक्ष्मी योजनेतील निधीही मागील दोन महिन्यांपासून लाभार्थ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे. काही लाभार्थ्यांना ऑगस्टचा निधी मिळाला आहे, मात्र जून आणि जुलैचा निधी मिळालेला नाही. त्यामुळे मात्र या दोन महिन्याचा निधी सुरळीत न देताच ऑगस्टचा देण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची फसवणूक होत असल्याची चर्चा होत आहे.

Advertisement
Tags :

.