आण्णा भाऊ साठे जयंती दिन विशेष : लोकशाहिरांच्या अध्यासनाला अनुदानाची प्रतिक्षा...
राजकीय नेत्यांनी लक्ष घालण्याची गरज
अहिल्या परकाळे कोल्हापूर
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची गुरूवारी, 1 ऑगस्टला 105 वी जयंती. या लोकशाहिरांच्या नावाने दहा वर्षापुर्वी शिवाजी विद्यापीठात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन स्थापन झाले. पण अध्यासनाला निधीची प्रतिक्षा आहे. विद्यापीठाच्या स्वनिधीतून अध्यासनाच्या विविध कार्यक्रम, उपक्रमांवर निधी खर्च करताना मर्यादा येत आहे. त्यामुळे निधीअभावी अध्यासनाला नेमके ठिकाण, कायमचा समन्वयक अद्यापी मिळालेला नाही. परिणामी लोकशाहिरांच्या जयंतीला विद्यापीठ अनुदानातून वर्षातून एकदा व्याख्यान, एखादी कार्यशाळा घेतली जाते. त्यामुळे नेत्यांसह सामाजिक संघटना सरकारकडे या अध्यासनाच्या निधीसाठी पाठपुरावा करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगावमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा 1 ऑगस्ट 920 रोजी जन्म झालो. त्यांनी ‘फकिरा’सह 35 कांदबऱ्यांचे लेखन केले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या जळवळीत शाहिरीच्या माध्यमातून मोठे योगदान दिले. समाजप्रबोधन केले. लोकशाहिरांचे 18 जुलै 1969 ला निधन झाले. या लोकशाहिरांनी केलेल्या कार्याची अपेक्षित दखल शासनाने घेतलेली नाही. शिवाजी विद्यापीठात 2014 मध्ये अण्णा भाऊ साठे अध्यासनाची स्थापना झाली. पण आजपर्यत या अध्यासनाला राज्य सरकारने अनुदान दिलेले नाही.
शिवाजी विद्यापीठ स्वनिधीतून अध्यासन चालवत असल्याने खर्चाच्या मर्यादा आहेत. त्यामुळे मराठी विभागातील प्राध्यापकाला समन्वयकपद देत अध्यासनाची वाटचाल सुरू आहे. अध्यासनातून संशोधनाद्वारे विद्यार्थ्यांनी लोकशाहिरांचे कार्य समाजासमोर आणण्याची गरज आहे. त्यासाठी सामाजिक संघटना व नेत्यांनी अध्यासनाला भरीव निधी देण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे.
अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, राजकारण, समाजकारण आणि वाड्.मयीन क्षेत्रात भरीव योगदान दिले. तरीदेखील कोल्हापूर, सांगलीतील नेत्यांनी त्यांच्या कार्याची अपेक्षित दखल घेतलेली नाही. संस्थात्मक पातळीवर शॉर्टटर्म कोर्स सुरू केल्यास लोकशाहिरांचे कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यास मदत होईल. विद्यापीठातील अध्यासनाला विविध क्षेत्रातून भरीव निधी मिळाल्यास अण्णा भाऊंच्या कार्यावर संशोधन, शॉर्टटर्म कोर्स सुरू करण्यास मदत होईल. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
श्रमिक प्रतिष्ठानतर्फे 10 पुस्तकांचा संच प्रकाशित
लोकशाहीरांचे कार्य लोकांपर्यंत पोहाचवण्यासाठी दिवंगत कॉ. गोविंद पानसरे यांनी 10 पुस्तकांचा संच प्रकाशित केला होता. या माध्यमातून लोकशाहिरांचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवले. यापलीकडे कोल्हापुरातून कोणतेच काम झालेले नाही, याची खंत आहे. लोकशाहिरांच्या नावाचा जयजयकार केला जातो. परंतु त्यांच्या नावे असलेल्या स्मारकरूपी अध्यासनाला निधी देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
लोकशाहिरांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतेय
लोकशाहिरांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून वंचित व उपेक्षित घटकाला स्थान दिले. त्यांच्या चरित्रावरील वाड्.मयीन निर्मितीवर विद्यापीठाने काही अंशी प्रकाशनाचे काम केले आहे. विद्यापीठ या अध्यासनातून लोकशाहिरांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे.
डॉ. रणधीर शिंदे (समन्वयक, अण्णा भाऊ साठे अध्यासन, शिवाजी विद्यापीठ)
अण्णा भाऊंच्या कांदबऱ्यांवर आधारित चित्रपट
अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबऱ्यावर निघालेल्या चित्रपटांमध्ये वैजयंता (1961, वैजयंता), टिळा लावते मी रक्ताचा (1969, आवडी), डोंगरची मैना (1969, माकडीचा माळ), मुरली मल्हारीरायाची (1969, चिखलातील कमळ), वारणेचा वाघ (1970, वारणेचा वाघ), अशी ही साताऱ्याची तऱ्हा (1974, अलगुज), फकिरा (फकिरा) यांचा समावेश आहे. फकिरा गाजलेली कादंबरी असून ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतेय काहिली’ ही फक्कड आजही लोकप्रिय आहे.