अनमोल खर्बला सुवर्ण
वृत्तसंस्थ / डेहराडून
येथे सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हरियाणाची 18 वर्षीय महिला बॅडमिंटनपटू अनमोल खर्बने एकेरीत सुवर्णपदक मिळविताना टॉपसिडेड अनुपमा उपाध्यायचा पराभव केला.
हरियाणाच्या अनमोल खर्बचा आशियाई सांघिक चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय संघात समावेश होता. महिला एकेरीच्या मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात अनमोलने अनुपमा उपाध्यायचा 21-16, 22-20 अशा सरळ गेमसमध्ये फडशा पाडत सुवर्ण पदक पटकाविले. गेल्या डिसेंबरमध्ये गुवाहाटी येथे झालेल्या मास्टर्स सुपर 100 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत अनमोलने उपविजेतेपद मिळविले होते. तसेच तिने गेल्यावर्षी बेल्जियम आणि पोलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली होती.
सतीशकुमार करुणाकरन आणि आद्या वरियात यांनी बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक पटकाविताना दीप रंबीया आणि अक्षया वारंग यांचा 21-11, 20-22, 21-8 असा पराभव केला. एच. बी. नितीन आणि प्रकाश राज यांनी पुरुष दुहेरीत सुवर्णपदक मिळविताना वैभव आणि आसित सुर्या यांचा 21-16, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव केला. भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने या स्पर्धेतून सोमवारी शेवटच्या क्षणी माघार घेतली. तर पुरुष एकेरीच्या सुवर्ण पदकाच्या लढतीत सतीशकुमार करुणाकरनची गाठ सुर्याक्ष रावतशी पडणार आहे.