राष्ट्रकुल टेटे स्पर्धेत अंकूर, यशस्वीनी विजेते
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
येथे नुकत्याच झालेल्या 22 व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या अंकूर भट्टाचार्यजी आणि यशस्वीनी घोरपडे यांनी अनुक्रमे पुरूष आणि महिला एकेरीतील अजिंक्यपदे मिळविली. या स्पर्धेमध्ये यजमान भारताने आपले निर्विवाद वर्चस्व राखताना पुरुष आणि महिला ऐकरी, महिला दुहेरी तसेच मिश्र दुहेरीतील अजिंक्यपदे मिळविली.
पुरूष एकेरीतील खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात अंकूर भट्टाचार्यजीने आपल्याच देशाच्या पायस जैनचा 11-8, 9-11, 7-11, 11-8, 4-11, 11-4, 11-9 अशा सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. हा अंतिम सामना शेवटच्या सेटपर्यंत अटितटीचा झाला. पण अंकूरने आपल्या अनुभवाच्या जोरावर पायस जैनचे आव्हान 4-3 अशा सेट्समध्ये संपुष्टात आणले.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या यशस्वीनी घोरपडेने आपल्याच देशाच्या श्रीजा अकुलाचा 11-6, 11-1, 8-11, 11-7, 13-11 अशा सेट्समध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्राच्या यशस्वीनीने श्रीजाला केवळ 1 सेट जिंकण्याची संधी दिली.
पुरुष दुहेरीत मलेशियाच्या शेन क्वि वाँग आणि जेव्हेन चुंग यांनी अंतिम फेरीतील लढतीत भारताच्या मानव ठक्कर आणि मनुष शाह यांचा 11-9, 12-10, 11-7 अशा सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले.
महिलांच्या दुहेरीमध्ये भारताच्या श्रीजा अकुला आणि सिंड्रेला दास यांनी अंतिम फेरीतील सामन्यात आपल्याच देशाच्या यशस्वी घोरपडे व दिव्यानीश भोमिक यांचे आव्हान 11-8, 11-13, 11-8, 11-6 असे संपुष्टात आणले.
भारताच्या तनिषा कोटेचा आणि मानव ठक्कर यांनी मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविताना टी व रिचर्ड याप यांचा 11-8, 10-12, 10-12, 11-9, 11-5 असा पराभव केला.