‘सिकंदर’मध्ये अंजिनी धवनला संधी
सलमान खानसोबत दिसणार स्टार किड
सलमान खानचा आगामी चित्रपट सिकंदरची क्रेझ आतापासूनच चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले असून यात अनेक कलाकारांची नावेही जोडली जात आहेत. साजिद नाडियावाला यांच्याकडून निर्मित हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास करत आहेत.
सिकंदर चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. या अभिनेत्रीने 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित बिन्नी अँड फॅमिली या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अंजिनी धवनला या चित्रपटात संधी मिळाली असून ती अभिनेता वरुण धवनची पुतणी आहे. अंजिनी लवकरच टीमसोबत चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करणार आहे. अंजिनीचे बिन्नी अँड फॅमिली या चित्रपटातील अभिनयासाठी कौतुक झाले आहे. सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने अंजिनीला बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यास मदत होणार आहे. सलमान खानच्या सिकंदर या चित्रपटात रश्मिका मंदाना, संजय दत्त, सत्यराज, काजल अग्रवाल, प्रतीक बब्बर यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी ईददरम्यान प्रदर्शित होणार आहे.