For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अंजणारी पुलाजवळ भीषण अपघात; उपचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरची पोलिसांच्या वाहनाला मागून धडक

09:33 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
अंजणारी पुलाजवळ भीषण अपघात  उपचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू  लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरची पोलिसांच्या वाहनाला मागून धडक
Advertisement
लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात हातखंबा वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस फौजदार संतोष गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या भरधाव कंटेनरने पोलिसांच्या शासकीय वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहने महामार्गालगत उलटली. या अपघातात पोलीस अंमलदार शिंगाडे आणि कंटेनरचा चालकही जखमी झाले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हातखंबा वाहतूक शाखेचे शासकीय वाहन (एमएच ०८ बीई ३५६१) अंजणारी पुलाजवळील उतारावरून जात होते. त्याचवेळी मागून वेगाने येणाऱ्या लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरने (आरजे ०९ जीई २३९७) पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, पोलिसांचे वाहन महामार्गावरून बाजूला जात खोल उतारावर उलटले. त्याचवेळी कंटेनरही रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

Advertisement

या अपघातात सहाय्यक पोलीस फौजदार संतोष गायकवाड आणि पोलीस अंमलदार शिंगाडे जखमी झाले. कंटेनरच्या केबिनमध्ये चालक अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करावे लागले. या तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना संतोष गायकवाड यांची प्राणज्योत मालवली. अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक सानप यांच्यासह लांजा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करून कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले. तसेच महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

Advertisement

या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताचे नेमके कारण आणि कंटेनरच्या वेगाबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.