अंजली शेखावतला नेमबाजीत सुवर्ण
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
24 व्या कुमार सुरेंद्र सिंग स्मृती नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत राजस्थानची महिला नेमबाज अंजली शेखावतने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविले.
महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात अंजली शेखावतने पात्र फेरीमध्ये चौथे स्थान मिळविले होते. पण त्यानंतर अंतिम फेरीत तिने 240.5 गुणांसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. हरियाणाच्या कनक बुधवारने 238.7 गुणाची नोंद करत रौप्य पदक तर पंजाबच्या अगम रणजीत कौर ग्रेवालने 216 गुणांसह कांस्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारातील पात्र फेरीअखेर तेलंगणाची ऑलिम्पिक नेमबाज इशा सिंगने आघाडीचे स्थान मिळविले होते तर ग्रेवालने दुसरे तर हरियाणाच्या मुस्कान चहलने तिसरे स्थान घेतले होते.
कनिष्ठ महिलांच्या विभागातील हरियाणाच्या कनक बुधवारने आपले वर्चस्व राखले होते. रेल्वेच्या युवीका तोमरला चौथ्या स्थानावर तर मुस्कान चहलला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. कनिष्ठ महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात हरियाणाच्या कनक बुधवारने सुवर्णपदक मिळविताना 238.4 गुण नोंदविले. हरियाणाच्या प्रियांशी पूर्वाने 237.5 गुणांसह रौप्य पदक तर हरियाणाच्या केतनने 216.8 गुणांसह कांस्यपदक घेतले.
युवा महिलांच्या विभागात 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत हरियाणाच्या कनक बुधवारने 244.3 गुणांसह सुवर्णपदक, हरियाणाच्या नव्याने 237.7 गुणांसह रौप्य तसेच सेनादलाच्या अंजली भागवतने 215.3 गुणांसह कांस्यपदक घेतले. सांघिक विभागात हरियाणाच्या संघाने सुवर्णपदक मिळविले. प्रियांशी पूर्वा, नव्या आणि सुरभी राव यांनी हरियाणाचे प्रतिनिधीत्व केले होते. या प्रकारात रेल्वेने रौप्य तर उत्तरप्रदेशने कांस्यपदक घेतले.