भारतवंशीय अनिता आनंद कॅनडाच्या पंतप्रधान होणार?
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाच्या खासदार अनिता आनंद यांच्या नावाचा प्राधान्याने विचार केला जात आहे. सत्ताधारी लिबरल पक्ष यावर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकीपूर्वी नवीन पंतप्रधान निवडू शकतो. पक्षाच्या बैठकीत अनिता यांच्या नावावर एकमत होऊ शकते, असे मानले जात आहे. असे झाल्यास कॅनडात पंतप्रधानपदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरतील. सध्या नवीन नेत्याची निवड होईपर्यंत ट्रुडो पंतप्रधान पदावर कार्यरत आहेत.
अनिता आनंद या लिबरल पक्षाच्या ज्येष्ठ सदस्या आहेत. 2019 पासून त्या कॅनडाच्या संसदेच्या सदस्याही आहेत. त्यांनी ट्रुडो सरकारमध्ये सार्वजनिक सेवा आणि खरेदी मंत्रालय, राष्ट्रीय संरक्षण मंत्रालय आणि ट्रेझरी बोर्डाचे अध्यक्षपद यासह अनेक प्रमुख पदे सांभाळलेली आहेत. 2024 पासून त्या परिवहन आणि अंतर्गत व्यापारमंत्री आहेत. पक्षाच्या नेत्यांच्या वाढत्या दबावानंतर, पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी 6 जानेवारी रोजी पक्षाचे नेते आणि पंतप्रधान या दोन्ही पदांचा राजीनामा दिला होता.
अनिता आनंद यांचे वडील तामिळनाडूचे तर आई पंजाबची होती. तथापि, अनिताचा जन्म कॅनडातील ग्रामीण भागात नोव्हा स्कॉशिया येथे झाला. त्यांनी क्वीन्स विद्यापीठातून राज्यशास्त्रातील कला विषयात पदवी, ऑक्सफर्ड विद्यापीठातून न्यायशास्त्र विषयात पदवी, डलहौसी विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि टोरंटो विद्यापीठातून कायद्यात मास्टर्स पदवी संपादन केली आहे. 57 वर्षीय अनिता या व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी 2019 मध्ये त्यांची पहिली संसदीय निवडणूक कॅनडातील ओकव्हिल मतदारसंघातून जिंकली. त्याचवर्षी त्यांना सार्वजनिक सेवा विभागाचे कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते.