For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मच्छे भागात जनावरांना ‘लम्पी’ रोगाची लागण

12:31 PM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
मच्छे भागात जनावरांना ‘लम्पी’ रोगाची लागण
Advertisement

लम्पीमुळे बैलाचा मृत्यू : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण : पशुवैद्यकीय खात्याकडून उपाय योजनेची गरज 

Advertisement

वार्ताहर/किणये

मच्छे भागात जनावरांना ‘लम्पी’ रोगाची लागण झाली आहे.‘लम्पी’ने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी महादेव गल्ली, मच्छे येथील सुरेश पिराजी लाड यांच्या एका बैलाचा लम्पी रोगामुळे मृत्यू झाला आहे. तर अन्य एका बैलाला लम्पीची लागण झाली आहे. यामुळे या भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत.

Advertisement

दोन वर्षांपूर्वी तालुक्यात जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली होती. त्यानंतर पशु खात्याच्यावतीने या रोगाच्या नियंत्रणासाठी योग्य ती खबरदारी घेऊन जनावरांना लस दिलेली होती. मध्यंतरीच्या कालावधीत लम्पी रोगाचे प्रमाण कमी झाले होते. पुन्हा मच्छे भागात लम्पी रोगाची लागण झाली आहे. यामुळे बैल व गाई असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मच्छे गावात एक देवाची गाय होती. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी लम्पी रोगाची लागण होऊन ही गाय दगावली. सध्या या गावात अन्य सहा ते सात जनावरांना लम्पीची लागण झाली असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली आहे. सुरेश लाड यांच्या दोन बैलांना लम्पी रोगाची लागण झाली. यातील एका बैलाचा सोमवारी मृत्यू झाला तर अन्य एका बैलाला या रोगाची लागण झाली आहे. या बैलांना गोठ्याच्या बाहेर बांधण्यात आले आहे.

लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

जनावरांचे डोळे व नाकातून पाणी येते. एक आठवडाभर जनावरांना भरपूर ताप येतो. दूध क्षमता कमी होते. त्वचेवर गाठी येतात. काहीवेळा तोंड, नाक व डोळ्यात जखमा होतात. सांधे व पायामध्ये सूज येते. अशी या लम्पी रोगाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास पशुवैद्यकीय खात्याच्या डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेण्यात घ्यावा, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी..

लम्पी रोगाची लागण झाल्यामुळे आता शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. ज्या जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. त्या जनावरांना  वेगळ्या गोठ्यात बांधण्याची गरज आहे. बाधित आणि निरोगी जनावरे एकत्रित चरावयास सोडू नयेत. तसेच बाधित भागातून जनावरांची ने आण करू नये. जनावरांच्या संपर्कात आलेला परिसर निर्जंतुक करण्याची आवश्यकता आहे.

लसीकरण मोहिमेबाबत जनजागृतीची गरज

आमच्या दोन्ही बैलांना लम्पी रोगाची लागण झाली. यातील एक बैल सोमवारी दगावला. यामुळे आमचे 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसऱ्या बैलाच्या अंगावर गाठी आल्या आहेत. त्यातून रक्तही येत आहे. पशुखात्याचे डॉ. कुलकर्णी  जनावरांची काळजी घेत आहेत. या रोगासंदर्भात लसीकरण मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.

-सुरेश लाड- मच्छे

Advertisement
Tags :

.