For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

11:06 AM Nov 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
Advertisement

काळविटांच्या मृत्युमुळे राज्यभरात खळबळ : मुक्या प्राण्यांची काळजी अधिक बारकाईने-काटेकोरपणे घेण्याची गरज

Advertisement

मनीषा सुभेदार/बेळगाव

बेळगावच्या भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील 31 काळविटांचा अलीकडेच दुर्दैवी मृत्यू झाला आणि हे प्राणी संग्रहालय चर्चेत आले. वास्तविक एक परिपूर्ण संग्रहालय म्हणून ते चर्चेत येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहे. परंतु, काळविटांच्या मृत्युमुळे राज्यभरात खळबळ उडाली. तपासणी, चौकशी, नमुने प्रयोगशाळेत पाठविणे ही सर्व प्रक्रिया होत राहील, आरोप-प्रत्यारोप, समर्थन हेसुद्धा होत राहील. परंतु, या सर्व पार्श्वभूमीवर 31 काळवीट मृत्युमुखी पडले, हे सत्य नाकारता येत नाही.

Advertisement

पशुवैद्यकीय खात्याने दिलेल्या मार्गदर्शक प्रणालीनुसार प्राण्यांना लस कधी द्यावी? त्यांचा आहार असा असावा? कोणते वातावरण त्यांना पोषक असते? हे सर्व नमूद करून लिखित स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातील पशुवैद्यकीय विभागाला पाठवण्यात आलेले असते. तज्ञांच्या माहितीनुसार काळवीट ही हरिणांचीच एक प्रजाती असून त्याला इंग्रजीमध्ये ब्लॅकबक म्हणतात. नर काळवीट काळ्या रंगाचा तर मादी भुऱ्या रंगाची असते. नरांना शिंगे असतात. यांची उंची सुमारे 29 ते 33 इंच असते. प्रामुख्याने गवताळ प्रदेशात आणि विरळ स्वरुपातील जंगली भागात जेथे पाणी उपलब्ध आहे तेथे काळविटांचा वावर असतो.

काळविटांचा मृत्यू झाला आणि अनेक प्रश्न समोर आले. त्यामध्ये एका मुख्य मुद्द्याकडे पर्यावरण संरक्षक व ज्यांनी या प्राणी संग्रहालयातील पहिला काळवीट दत्तक घेतला त्या गिरीधर कुलकर्णी यांनी या प्राणी संग्रहालयाला कायम स्वरुपात कार्यकारी वनसंचालक अधिकाऱ्याची नेमणूक होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले व तशा अर्थाचे पत्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे पाठविले.

हा मुद्दा महत्त्वाचा यासाठी की, सध्या प्राणी संग्रहालयाची जबाबदारी उपवनसंरक्षक सांभाळत आहेत आणि त्यांच्यावर अन्य अनेक जबाबदाऱ्या आहेत. एकच व्यक्ती दोन डगरींवर पाय ठेवून जेव्हा काम करते तेव्हा ती कोणत्याच कामाला पूर्ण न्याय देऊ शकत नाही. भले अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असेल, काही त्रुटी-उणीवा असतील, निधीचा प्रश्न असेल. परंतु, या प्राणी संग्रहालयामध्ये कायमस्वरुपी अधिकारी असणे नितांत गरजेचे आहे. पशुवैद्यकीय तज्ञांशी चर्चा करता मृत्युमुखी पडलेले काळवीट हेमोरेजेसिक सेप्टोमेनिया या रोगामुळे दगावले असल्याचे प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे. मराठीमध्ये या रोगाला रक्तस्रावी किंवा गळाफुली रोग असे म्हटले जाते. ‘पाश्चरेला मल्टोसिडा’ या जीवाणूमुळे हा रोग होतो.

रोगाची साधारण लक्षणे म्हणजे तीव्र ताप येणे, श्वास घेण्यास अडचण होणे, अथवा जाणवणे, नाका-तोंडातून रक्त येणे, पोट फुगणे ही असू शकतात. याशिवाय जेथे यांचा अधिवास आहे तेथे अस्वच्छता असणे, दूषित पाणी पिण्यानेसुद्धा हा रोग होऊ शकतो. वेदना असह्या झाल्याने प्राणी ओरडू लागतात. जर ही लक्षणे असतील तर प्राणी संग्रहालयाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्यांच्या लक्षात ही बाब आली नाही का? हा प्रश्न आहे. याचे कारण कदाचित काळविटांकडे झालेले दुर्लक्ष हेसुद्धा असू शकते. प्रथम 8 काळविटांचा मृत्यू झाला आणि नंतर 20, आणखी 2 व आणखी 1 अशा क्रमाने काळवीट दगावले. यातील एकाही काळविटाच्या बाबतीत ही लक्षणे आढळली नाहीत का? हा प्रश्न उद्भवतो. मात्र, अधिकाऱ्यांनी अशी कोणतीही लक्षणे आढळली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

चाऱ्याची कमतरता हेसुद्धा कारण असू शकते. मग अशा प्राणी संग्रहालयांमध्ये मुबलक चारा उपलब्ध असतो का? त्यासाठीचा निधी वेळेवर मिळतो का? हा प्रश्न आहे. प्राण्यांचे लसीकरण हे काटेकोर पद्धतीने करणे व त्यांना वेळच्या वेळी आहार देणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या काळविटांना शेंगदाण्याचे पीठ, भिजविलेले हरभरे, गाजर व नेपियर गवत असा आहार दिला जात होता. परंतु, तो आहार पुरेसा नाही. पशुवैद्यकीय खात्याने सर्व प्रजातींसाठी आहाराचे वेळापत्रक ठरवून दिले आहे. ती माहिती तक्त्यामध्ये दिली आहे.

काळविटांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबद्दल अनेक तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत. याच संदर्भात डीसीएफ (उपवनसंरक्षणाधिकारी) एन. ई. क्रांती यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, नोव्हेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच साधारण 20 दिवसांपूर्वी प्रचंड पाऊस झाला. हवेत आर्द्रता निर्माण झाली. त्या पाठोपाठ असह्या उन्हाचे चटके बसले. काळवीट हा प्राणी अत्यंत संवेदनशील आहे. हवामानातील बदल त्याला सहन झाले नाहीत. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होत गेली आणि एका पाठोपाठ एक काळविटांचे मृत्यू झाले.

त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिबंधात्मक लस देणे शक्य नव्हते का? या प्रश्नावर ते म्हणाले, हा प्राणी अत्यंत भित्रा आहे. त्याला पकडण्याचा प्रयत्न जरी आपण केला तरीसुद्धा त्याचा हृदयाघात होऊ शकतो. त्यामुळे त्याला इंजेक्शन देणे शक्य नाही. लसीकरण करणेही शक्य नाही. जे काही औषधोपचार करावयाचे होते ते अन्नाद्वारेच करावे लागतात. या प्राण्यांच्या क्वॉरंटाईन संदर्भात (विलगीकरण) विचारणा करता त्यांना असे वेगळे ठेवता येत नाही. ते अत्यंत भित्रे आणि लाजाळू असतात, असे त्यांनी सांगितले. जेव्हा पहिल्याच काळविटाचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही त्वरित बेंगळूरमधील तज्ञांना पाचारण केले. डॉक्टरांनी ज्या पद्धतीने आम्हाला सूचना केल्या, त्याप्रमाणे उपचारास प्रारंभ केला. दूषित पाणी प्याल्याने किंवा ज्या ठिकाणी काळविटांचा वावर आहे तेथे अस्वच्छता होती का? या प्रश्नावर क्रांती यांनी नाही, असे उत्तर दिले. शिवाय बेंगळूरहून आलेल्या तज्ञांनी त्याबाबत हिरवा कंदीलही दिल्याचे स्पष्ट केले.

वन्यजीव प्राण्यांच्या आजाराचे तीन प्रकार केले जातात. ज्यामध्ये अॅक्यूट, क्रॉनिक आणि पॅराक्यूट असे ते प्रकार आहेत. जीवाणूंमुळे होणाऱ्या आजारांचे कोणतेही लक्षण काळविटांमध्ये आढळून आले नव्हते. ताप येणे, रक्तस्राव होणे अशी कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. 72 तासांमध्ये 31 काळविटांचा मृत्यू झाला. सध्या 7 काळवीट असून त्यांची सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. हे प्राणीसंग्रहालय राज्यातील इतर प्राणी संग्रहालयांच्या तुलनेत लहान आहे. त्याची व्याप्ती वाढविण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सध्या या प्राणी संग्रहालयामध्ये एकूण 195 प्राणी आहेत, ज्यामध्ये वाघ, सिंह, बिबट्या, तरस, कोल्हा, मगर, हरिण, सांबर, मोर, इमू, कबुतर यांचा समावेश आहे. काळवीट असलेला भाग सोडून प्राणी संग्रहालय सर्वांसाठी खुले आहे.

प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची हेळसांड होऊ नये यासाठी नागरिकांनी प्राणी दत्तक घेण्याची योजनाही कार्यान्वित आहे. ‘झू अॅडॉप्ट अॅथॉरिटी ऑफ कर्नाटका’चे जे अॅप आहे, त्यामध्ये प्राण्यांची दत्तक घेण्याची प्रक्रिया कशी असते, याचा सर्व तपशील देण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांना प्राणी दत्तक घेऊन त्यांच्या देखभालीची सोय करता येते. यासंदर्भात अॅथॉरिटीकडून प्रमाणपत्रही देण्यात येते.

प्राणी बोलू शकत नसल्याने त्यांची काळजी अधिक बारकाईने व काटेकोरपणे घेण्याची गरज आहे. आम्ही सर्व ती उपाययोजना केल्याचे समर्थन अधिकारी करतील. त्रुटी दूर करण्याचे आश्वासन देतील. परंतु, कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिकरीत्या होणारा मृत्यू वगळता कोणाच्याही दुर्लक्षामुळे, असुविधांमुळे, वैद्यकीय उपचारांअभावी प्राण्यांचे मृत्यू होणार नाहीत, याची काळजी घेणे ही वनखात्याची आणि प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. घटना घडल्यानंतर स्पष्टीकरण देण्याऐवजी पूर्वखबरदारी घेणे हे श्रेयस्कर ठरेल.

  • प्राणी संग्रहालयात एकूण 195 प्राणी
  • वाघ, सिंह, कोल्हा यासह अन्य प्राण्यांचा समावेश
  • सध्या 7 काळवीट असून ते सुरक्षित आहेत
  • प्राणी संग्रहालयाची व्याप्ती वाढविण्याचा विचार
  • प्राणी संग्रहालय जनतेसाठी खुले आहे
Advertisement
Tags :

.