प्राण्यांची नावे आपत्यांना
चीनमधील एक प्रथा सध्या चर्चेत आहे. या प्रथेनुसार आपल्या अपत्यांना त्यांचे मातापिता प्राण्यांची नावे ठेवतात. कुत्रा किंवा डुक्कर अशी नावे ठेवल्याने अपत्यांना दीर्घायुष्याचा लाभ होतो, अशी समजूत या प्रथेमागे असल्याचे बोलले जाते. भारताप्रमाणेच चीनमध्येही मोठ्या प्रमाणात अपत्याचा जन्म झाल्यानंतर त्याची जन्मकुंडली बनवून अपत्य किती भाग्यवान आहे, याची परीक्षा केली जाते. जर जन्मकुंडली समाधानकारक नसेल, किंवा तिच्यावर अनिष्ट ग्रहांचा प्रभाव अधिक असेल, तर अशा अपत्यांना प्राण्यांची नावे ठेवल्यास त्यांच्यावरचे अरिष्ट टळून ती दीर्घायुषी होतात, असे या देशातील अनेक मातापित्यांना वाटत आहे.
ही समजूत एका प्राचीन चीनी लोककथेतून आली आहे. या लोककथेतही असे स्पष्ट करण्यात आले आहे, की, आपल्या अपत्याची कुंडली योग्य नसेल, तर त्यांना प्राण्यांची नावे ठेवा, असे केल्याने त्यांच्या कुंडलीतील दोष जातील आणि आपली अपत्ये भाग्यवान होतील. त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभेल. या लोककथेचा पगडा अनेक चीनी नागरीकांवर एवढा आहे, की या प्रथेचे कसोशीने पालन केले जाते. वास्तविक चीन वैज्ञानिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहे. पण तेथेही समाजामध्ये अशा समजुती मोठ्या प्रमाणात आहेत. चीनमध्ये बालमृत्यूदरही अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळेही अशा प्रथांचा प्रभाव समाजावर पडतो. केवळ नावेच अशा प्रकारची ठेवली जातात असे नाही. अशा अपत्यांच्या डोक्यावर अशा प्राण्यांच्या कातड्याची टोपीही घातली जाते. अनेक मातापिता अशा अपत्यांची नावे थेट प्राण्याची न ठेवता जुने डुक्कर, डुकराचे शीर, कुत्र्याचे अंडे, अशा चित्रविचित्र अर्थांची ठेवतात. यामागचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे आपल्या अपत्याची सर्व इडापिडा टळावी आणि त्याचे भले व्हावे. भारतातही पूर्वी अपत्ये जगावीत यासाठी त्यांची नावे दगड्या, धोंड्या, धोंडो अशा प्रकारची ठेवत असत. अलिकडच्या काळात भारतातून ही प्रथा निदान शहर भागांमध्ये तरी बरीचशी कमी झाली आहे. पण चीनमध्ये सुशिक्षित आणि शहरी मातापिताही अशी प्रथा आवर्जून पाळताना दिसतात. अशा मानवी समजुती सर्वत्र सारख्याच असतात, हे यावरुन स्पष्ट होते. प्राचीन संस्कृती असणाऱ्या देशांमध्ये अशा प्रथा असतात.