हिंडलगा कारागृहातील महिला कैद्यांना पशुसंगोपनाचे धडे
पशुसंगोपन खात्याचा उपक्रम
बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील महिला कैद्यांसाठी शेळी व बकरी पालन याविषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. हिंडलगा कारागृह व पशुसंगोपन खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणात कारागृहातील 22 महिला कैद्यांनी भाग घेतला होता. पशुसंगोपन खात्याचे संचालक डॉ. मंजुनाथ पाळेगार, डॉ. परमेश्वर नायक, डॉ. राजीव कुलेर यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृहाचे प्रभारी मुख्य अधीक्षक बी. एम. कोट्रेश उपस्थित होते.
यावेळी प्रशासकीय अधिकारी बी. एस. पुजारी, साहाय्यक अधीक्षक बी. कृष्णमूर्ती, शशिकांत यादगुडे, साहाय्यक अधीक्षक मल्लिकार्जुन कोण्णूर, डॉ. महादेवी तेली, डॉ. संगमेश मरिप्पन्नवर आदी उपस्थित होते. कारागृहातील कैद्यांसाठी दुग्धव्यवसाय व पशुसंगोपन आदींविषयी प्रशिक्षण दिले जाते. कुक्कुट पालनासंबंधीचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे. कैद्यांनी कारागृहातून सुटका झाल्यानंतर स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रशिक्षणातील शिकवणीप्रमाणे व्यवसाय करावेत. या योजनांसाठी कर्जही मिळते. यासाठी पशुसंगोपन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. मंजुनाथ पाळेगार यांनी केले. यावेळी प्रथमच महिला कैद्यांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.