अनिल अंबानी समूहाची 1,120 कोटींची संपत्ती जप्त
मनी लाँड्रिंग प्रकरणात आतापर्यंत 10,117 कोटींच्या मालमत्तांवर कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या 1,120 कोटी रुपयांच्या नवीन मालमत्ता जप्त केल्या. आतापर्यंत अनिल अंबानी समूहाविरुद्ध जप्त केलेली एकूण मालमत्ता 10,117 कोटी रुपये झाली आहे. मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील रिलायन्स सेंटर, मुदत ठेवी (एफडी), बँक बॅलन्स आणि अनलिस्टेड गुंतवणूक यासह 18 मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून शनिवारी सांगण्यात आले. या कारवाईदरम्यान रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या सात, रिलायन्स पॉवरच्या दोन आणि रिलायन्स व्हॅल्यू सर्व्हिसेसच्या नऊ मालमत्ता देखील गोठवण्यात आल्या आहेत.
ईडीने रिलायन्स व्हेंचर अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि फाय मॅनेजमेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडसह इतर ग्रुप कंपन्यांच्या एफडी आणि गुंतवणूक देखील जप्त केल्या आहेत. यापूर्वी, ईडीने बँक कर्ज फसवणूक प्रकरणांमध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि रिलायन्स होम फायनान्स यांच्या 8,997 कोटी रुपयां जास्त किमतीच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या.
ईडीने अनिल अंबानींच्या सुमारे 1,400 कोटी किमतीच्या मालमत्ता 20 नोव्हेंबर रोजी जप्त केल्या होत्या. या मालमत्ता नवी मुंबई, चेन्नई, पुणे आणि भुवनेश्वर येथे होत्या. त्यापूर्वी 3 नोव्हेंबर रोजी निधी वळवण्याच्या प्रकरणासंदर्भात अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपची 132 एकर जमीन जप्त करण्यात आली होती. ही जमीन नवी मुंबईतील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी (डीएकेसी) मध्ये असून त्याची किंमत 4,462.81 कोटी रुपये इतकी आहे. याव्यतिरिक्त ग्रुपच्या 40 हून अधिक मालमत्ता देखील जप्त करण्यात आल्या आहेत.