अनिल अंबानींवर 5 वर्षांसाठी शेअर बाजारात बंदी
अंबानींना 25 कोटी रुपयांचा दंड : समभाग 14 टक्क्यांनी घसरले
वृत्तसंस्था/ मुंबई
बाजार नियामक सेबीने उद्योगपती अनिल अंबानी यांना फंड हेराफेरीप्रकरणी पाच वर्षांसाठी शेअर बाजारातून बंदी घातली आहे. तसेच अंबानींना 25 कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यांना कोणत्याही लिस्टेड कंपनीत संचालक होण्यासही बंदी घातली आहे. यासह, रिलायन्स होम फायनान्सच्या माजी प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर 24 संस्थांवर स्वतंत्रपणे बंदी आणि दंड ठोठावण्यात आला आहे. रिलायन्स होम फायनान्सवर सहा महिन्यांची बंदी आणि सहा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सेबीने जारी केलेल्या 222 पानांच्या अंतिम आदेशानुसार, अनिल अंबानी यांनी आरएचएफएल अधिकाऱ्यांच्या मदतीने पैशांचे लाँड्रिंग केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांनी स्वत: निधी वापरला, परंतु ते कर्ज म्हणून दिल्याचे दाखवले.
सेबीच्या आदेशाशी संबंधित मोठ्या गोष्टी...
? संचालक मंडळाने अशी कर्जे बंद करण्याचे आणि कॉर्पोरेट कर्जाचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश दिले होते, परंतु कंपनीच्या व्यवस्थापनाने या आदेशांकडे दुर्लक्ष केले.
? सेबीने म्हटले आहे की, परिस्थिती लक्षात घेता, आरएफएचएलला फसवणुकीत गुंतलेल्या व्यक्तींइतकेच जबाबदार धरले जाऊ नये. इतर संस्थांनी निधी वळवण्यास मदत केली.
? अनिल अंबानी यांना 25 कोटी रुपये, अमित बापना यांना 27 कोटी रुपये, रवींद्र सुधाळकर यांना 26 कोटी रुपये आणि पिंकेश आर शहा यांना 21 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
? रिलायन्स युनिकॉर्न एंटरप्रायझेस, रिलायन्स एक्सचेंज नेक्स्ट, यासह इतरांना निधीच्या फेरफारमध्ये सहभागासाठी प्रत्येकी 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
? रिलायन्स इन्फ्रा समभाग जवळपास 14 टक्के घसरले
सेबीच्या बंदीनंतर अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स पॉवर या कंपन्या कोसळल्या आहेत. रिलायन्स इन्फ्रा सर्वात जास्त 14 टक्के, रिलायन्स होम फायनान्स 5.12 टक्के आणि रिलायन्स पॉवर 5.01 टक्क्यांनी घसरले.