Kolhapur: बहिणीला शिवी दिल्याच्या रागातून तरुणावर एडक्याने हल्ला
बागल चौक येथील घटना, चार अल्पवयीन संशयितांचे कृत्य
कोल्हापूर : बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून पेटींग काम करणाऱ्या तरुणावर एडक्याने प्राणघातक हल्ला केला. फिल्मी स्टाईलने जखमी संदीप बाळू खोत (वय ३२ रा. दौलतनगर, राजारामपुरी) याला बागल चौक येथे बोलावून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी चार अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बागल चौक येथे ही घटना घडली.
दौलतनगर येथे राहणारा संदीप खोत हा पेटींग काम करतो. तो परिसरातील एका तरुणीस भेटण्यासाठी रविवारी सकाळी गेला होता. यावेळी या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संदीप खोतने संबंधित तरुणीस अर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली. याची माहिती संबंधित तरुणीने आपल्या लहान
भावाला दिली. लहान भावाने संदीपला सायंकाळी भेटण्यास बोलाविले. ८ वाजण्याच्या सुमारास संदीप दुचाकीवरुन बालग चौक परिसरात आला.
यावेळी चार अल्पवयीन संशयित त्याच ठिकाणी आले. त्यातील एकाने तु माझ्या बहिणीला शिवीगाळ करत संदीपच्या छातीवर डाव्या बाजूस एडक्याने प्राणघातक हल्ला केला. तर इतर अन्य साथीदारांनी बेल्टसह लाथाबुक्यांनी मारहाण करुन घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान परिसरातील नागरिकांनी संदीपला सीपीआरमध्ये दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस अधिक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव हे दाखल झाले. रात्री उशिरा संदीपच्या तक्रारीनंतर चार अल्पवयीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना सोमवारी सकाळी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे करत आहेत.
सराईत गुंडाची इंट्री आणी सीपीआरमध्ये तणाव
या घटनेनंतर सीपीआर रुग्णालयाच्या आवारात मोठा तणाव निर्माण झाला होता. शाहूपुरी बागल चौक परिसरातील एका सराईत गुंडाने सीपीआर रुग्णालयात हजेरी लावली. त्याचे समर्थकही सीपीआरमध्ये दाखल झाले. आपल्या दादाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली अशी अफवा पसरल्यामुळे सीपीआरमध्ये रविवारी रात्री १ वाजेपर्यंत मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक संतोष डोके, संजीव झाडे यांनी सीपीआर रुग्णालयात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.