For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हमासविरुद्ध पॅलेस्टाईनमध्ये प्रक्षुब्ध जनआंदोलन

06:01 AM Jun 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
हमासविरुद्ध पॅलेस्टाईनमध्ये प्रक्षुब्ध जनआंदोलन
Advertisement

दहशतवाद म्हणजे लोकशाहीला आव्हान आहे. सामान्य जनतेच्या कल्याणाचा विचार न करता त्यांच्या आशा आकांक्षा पायदळी तुडविल्या जातात तेव्हा लोक पेटून उठतात आणि दहशतवादाचे समूळ उच्चाटन करू शकतात.संबंध जगाला चकित करणारी आणि हादरवून टाकणारी एक घटना मागील महिन्यात घडून आली. ती घटना म्हणजे हमास या दहशतवादी संघटनेच्या विरोधात पॅलेस्टाईनमधील प्रक्षुद्ध जनतेने जोरदार निदर्शने केली. दहशतवाद बंद करा, हमासला बाहेर काढा, आम्हाला आता युद्ध नको आहे अशा घोषणा देत लोक रस्त्यावर उतरले. त्यामुळे आम्ही पॅलेस्टिनी जनतेचे रक्षक म्हणून उर बडविणाऱ्या हमासचे पितळ उघडे पडले आहे आणि जगासमोर त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे.

Advertisement

गेल्या तीन वर्षांपासून हमासने इस्रायल विरुद्ध कुरापती करून 7 ऑक्टोबर 2023 च्या मध्यरात्री इस्रायलमध्ये संकट उभे केले. महिलांवर अत्याचार करण्यात आले. अनेकांना पकडण्यात येऊन ओलीस ठेण्यात आले. त्या विरुद्ध इस्रायलने आक्रमक पवित्रा घेतला आणि अखेर आता युद्ध निवळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, हमासच्या आक्रमक कारवायांमुळे जर्जर झालेल्या पॅलेस्टाईनमधील जनतेने आता खुद्द हमास विरुद्ध दंड थोपटले आहेत. त्यामुळे गाझा पट्टीतील गलबला आता नवे वळण घेत आहे. हमासचे राज्य पॅलेस्टाईनमध्ये हवे कशाला, हे तर दहशतवादी आहेत. आमची त्यांनी वाट लावली आहे. आमच्या लोकांना उपासमार करण्याची वेळ आली आहे. आम्ही युद्धामुळे जर्जर झालो आहोत. आम्हाला खायला मिळत नाही, प्यायला पाणी नाही, आरोग्याच्या सुविधा नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हमासचे राज्य आम्ही का म्हणून सहन करावे, असा प्रश्न पॅलेस्टिनी जनतेमध्ये निर्माण होणे साहजिक आहे. त्याचे प्रत्यंतर म्हणजे मागील एप्रिल महिन्यात सातत्याने हमास विरोधी गाझापट्टी झालेली जनआंदोलने हे होय.

व्यापक निदर्शने

Advertisement

25 मार्च 2025 पासून हमासविरोधी आंदोलनाचे रणशिंग पॅलेस्टिनी जनतेने फुंकले. महिनाभर थोड्या विश्रांतीनंतर अनेक शहरांतूनही आंदोलने झाली आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे हमासचे नेतृत्व आणि त्यांची राजकीय रणनीती याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आजवर हमासने पॅलेस्टिनी जनतेला गुमराह करून खोट्या ध्येयवादाच्या दिशेने पछाडले आणि त्यांना युद्धाच्या खाईत लोटल्यामुळे त्यांचे नित्य जीवन संकटमय बनले, कंटकमय बनले. आता त्यांना युद्धाचा उबग आला आहे. त्यांना शांतता हवी आहे. त्यांना थोडासा विसावा हवा आहे. परंतु, युद्धखोर हमास मात्र थांबायला तयार नाही, त्यामुळे हा तिढा निर्माण झाला आहे. ही हमासच्या प्रभावाची शोकांतिका आहे. किंबहुना, संपूर्ण जगातील इस्लामिक दहशतवादाचा सुद्धा तो नैतिक पराभव आहे, असे म्हणावे लागेल.

आंदोलनकर्त्या जनतेच्या भावना समजावून घेण्याऐवजी हमासने मात्र उलटा पवित्रा घेतला. सहा आंदोलकांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. अनेकांना सार्वजनिकरित्या फटके मारले आणि त्यांचे अनन्वित छळ करून अत्याचार केले. गाझा युद्धाचा शेवट करावा, तातडीने शांतता प्रस्थापित करावी आणि आता युद्ध थांबवावे अशी आंदोलनकर्त्या मायबाप जनतेची मागणी आहे. पण, युद्धखोर दहशतवादी हमासला त्यांची दु:खे कशी कळणार? गाझा पट्टीतील आपली सत्ता हमास सहजासहजी सोडेल असे वाटत नाही, कारण आयत्या बिळात नागोबा या म्हणीप्रमाणे त्यांच्या हाताला राजकीय सत्तेचे कोलीत सापडले आहे व ते मनमानी पद्धतीने तेथील जनतेवर राज्य करत आहेत. पण आजवर जे सहन केले ते यापुढे सहन करावयाचे नाही, असे पॅलेस्टिनी जनतेने ठरविले आहे. त्यामुळे धुमसता असंतोषाचा अग्नी हमासला केव्हा संपवून टाकेल, ते सांगता येणार नाही. निदर्शकांची संख्या किती, असा प्रश्न जगातील प्रसारमाध्यमे विचारत आहेत.  निदर्शक शेकडोंनी आणि हजारोंनी होते. काहींनी आकडा 2000 दिला आहे, तर काहींनी दहा हजारांपेक्षा जास्त दिला आहे.

बरेच लोक घरात बसून आपला असंतोष व्यक्त करत होते. जे काही रस्त्यावर आले त्यांची ही संख्या हजारामध्ये होती. पण, हमासच्या दडपशाहीला आणि अत्याचारांना घाबरून अनेक लोक बाहेर पडले नाहीत, हे कटू सत्य आहे. 2011 आणि 2012 तसेच 2019 आणि 2023 पासून आतापर्यंतचे हे सर्वात मोठे जनआंदोलन आहे. त्यामुळे हमासची पाचावर धारण बसली आहे आणि हमासचे नेते चिंताग्रस्त झाले आहेत. पॅलेस्टाईनच्या भूमीवर मानवतावादी संकट आले. तेथील जनतेचे आरोग्य धोक्यात सापडले. अन्न, वस्त्र, निवारा हे प्रश्न निर्माण झाले. औषध-पाण्याची टंचाई झाली. पण, त्याची पर्वा हमासने केली नाही. गरीब जनता भरडली गेली आणि नेते मात्र युद्धाच्या मोठमोठ्या गर्जना करत बसले. आता जनता पुरती विटली आहे, कंटाळली आहे. लोकांना युद्ध नको आहे. ऊर्जा संकट, दुष्काळ, अन्नधान्याची टंचाई, आरोग्य सुविधांचा अपुरेपणा या सर्व समस्यांचा सामना करत जनता पुरती कंटाळली आहे. 2025 मध्ये हमासची लोकप्रियता एवढी घसरली आहे की, आता त्यांच्या पाठीशी फक्त 43 टक्के समर्थन उरले आहे, ते सुद्धा कठीणच आहे. 2025 च्या गॅलप सर्वेक्षणानुसार लोक आता एवढे वैतागले आहेत की, संधी मिळाल्यास ते गाझापट्टी सोडून निर्वासित म्हणून बाहेर निघून जाण्यास तयार आहेत. मागील काही महिन्यात झालेल्या युद्धबंदीनंतर परिस्थिती अधिक बिकट आणि कठीण झाली आहे. लोकांना नित्य जीवन म्हणजे तारेवरची कसरत ठरली आहे. याबाबत जगातील विविध वृत्त संस्थांनी दिलेले अहवाल मोठे चिंताजनक आहेत तसेच वस्तुनिष्ठ आहेत. सीएनएन या वृत्तसंस्थेच्या मते बेट लोहिया येथे हजारो निदर्शकांनी आंदोलने केली. एपी या वृत्तसंस्थेने 3,000 एवढा आकडा दिला आहे. पूर्वेकडील एका वृत्तसंस्थेने निदर्शक दहा हजारपेक्षा जास्त होते,असा अंदाज व्यक्त केला आहे.

हमास दहशतवादी आहेत. त्यांनी आता बाहेर पडावे, गाझापट्टी सोडावी, आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला शांतता हवी अशा प्रकारच्या घोषणा आंदोलक देत होते आणि ते एका अर्थाने हमासचे मुखवटेच खाली उतरवत होते. हमासवाले आमचे प्रतिनिधी नाहीत. युद्ध थांबवा, देश सोडा अशा प्रकारचा आदेशच जणूकाय आंदोलकांनी दिला. हमासच्या सैनिकांनी शाळा आणि दवाखान्यापासून दूर राहावे, नाहीतर आम्ही त्यांना हुसकावून देऊ असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे, असे बीबीसीचे म्हणणे आहे.

बेट लाहिया केंद्र

बेट लाहिया हे शहर या निदर्शकाच्या आंदोलनाचे केंद्र बनले आणि तेथून आंदोलनाचे लोण संपूर्ण गाझापट्टीत पोहोचले. या चळवळीचा प्रसार कसा झाला आणि हमासची झोप त्यामुळे कशी उडाली हे पाहता असे दिसते की, 26 मार्च, 27 मार्च, त्यानंतर 2 एप्रिल तसेच 6 एप्रिल, 16 एप्रिल 27 एप्रिल 19 मे अशा प्रकारे सातत्याने लोकांनी प्रक्षुद्ध निदर्शने केली आणि हमासने त्यांच्या पदरात काय दिले, तर लाठीमार, मृत्युदंड आणि फटक्यांची शिक्षा जणू त्यांचा सुडच उगवला. अशाप्रकारे आपल्या पायाखालची वाळू घसरत आहे, हे पाहून हमासचे नेते हताश झाले आहेत आणि ते निदर्शकांच्या विरुद्ध सूड उगवित आहेत, ही मोठी दु:खद गोष्ट आहे.

समाजशास्त्राrय विश्लेषण

या आंदोलनाचे राजकीय समाजशास्त्र दृष्टीने विश्लेषण केले असता असे दिसते की, हमास पॅलेस्टिनी आणि इस्रायल यांच्या प्रतिक्रिया परस्परविरोधी आहेत. त्यांनी आपापल्या हितसंबंधांचे जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. खरे तर इस्लामिक दहशतवादाची ही उतरती कळा आहे. खुद्द इस्लामी जनतेलाही आता कळून चुकले आहे की, दहशतवादामुळे कोणाचेही भले होणार नाही. धर्माचे रक्षण होणार नाही आणि मानवतेचे कल्याण होणार नाही. शेजारी राष्ट्रावर मध्यरात्री केलेला हल्ला हा मानवी होता आणि अशा प्रकारचे हल्ले करून आपण जगात शांतता निर्माण करू शकत नाही, ही गोष्ट आता सामान्य जनतेच्या लक्षात येत आहे.

पॅलेस्टिनी जनतेच्या जी गोष्ट लक्षात आली ती गोष्ट आता पुढे चालून पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेच्याही लक्षात येईल आणि तेही दहशतवादाचे समोर उच्चाटन करण्यासाठी पुढे सरसावतील तेव्हा गाझापट्टीत जे घडले ते अंतर्मुख करायला लावणारे आहे. यापुढे दहशतवाद टिकणार नाही. सामान्य जनता दहशतवादाचे समर्थन करणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मानवतावादी कल्याणाच्या दृष्टीने विचार करता असे दिसते की युद्धामुळे प्रश्न सुटत नाहीत, तर ते अधिक बिकट होतात, ही गोष्ट हमास जेव्हा लक्षात घेईल तेव्हा बराच काळ लोटलेला असेल. गाझापट्टी आता उद्ध्वस्त झाली आहे. सामान्य

जनता टाहो फोडत आहे

युद्ध नको शांतता राखा, जनतेकडे पहा, तुम्ही कशासाठी युद्ध करता, तुमची स्वप्न काय आहेत, तुमचा ध्येयवाद खोटा आहे, तुम्ही खऱ्या अर्थाने पॅलेस्टिनी जनतेचे प्रतिनिधी नाहीत, असे गाझामधील पॅलेस्टिनी सामान्य जनतेचा आक्रोश आहे, तो आक्रोश हमासच्या कानामध्ये पोहोचवतील की नाही, याबद्दल शंका वाटते. कारण त्यांचे कान आता किट्ट झाले आहेत. त्यांना ऐकू येत नाही, पण सत्य कटू असते. ते जेव्हा कळेल तेव्हा बराच काळ लोटलेला असेल. पण, युद्धाचा शेवट अटळ आहे. ही गोष्ट मात्र खरी आहे.

प्रा. डॉ. वि. ल.धारूरकर

Advertisement
Tags :

.