पाकिस्तानात महागाईमुळे संतप्त लोक रस्त्यावर
गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने : इंटरनेट सेवाही बंद
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकव्याप्त काश्मीरमध्ये महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईविरोधात आता जनता रस्त्यावर आली आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. गव्हाच्या दरवाढीविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. अवामी कृती समितीने व्यापारी, वाहतूकदार आणि हॉटेल मालकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनांशी चर्चा करून संपाची हाक दिली आहे. वाढता जनक्षोभ अन्यत्र पसरू नये म्हणून येथील इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली होती.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, गिलगिट-बाल्टिस्तानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. या निदर्शनात लोक सहभागी होत असल्याने वाहतूकही बंद करण्यात आली आहे. याशिवाय गिलगिट, स्कर्दू, दियामेर, घैसेर, अस्टोरे, शिघर, घांचे, खरमांग आणि हुंजा येथील विविध भागातील दुकाने, बाजार, रेस्टॉरंट आणि व्यवसाय केंद्रे शुक्रवारी बंद राहिली.