संतप्त शेतकऱ्यांनी मंगाईनगर येथील तलावाचे काम थांबविले
कडधान्य खराब होत असल्याने वडगाव-धामणे शिवारातील शेतकऱ्यांनी विचारला जाब
बेळगाव : मंगाईनगर, वडगाव येथील तलावाच्या सुशोभीकरणासाठी तलावातील पाणी शिवारात सोडल्याने धामणे-वडगाव शिवारातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी मंगाई तलाव येथील सुशोभीकरणाचे काम बंद पाडले. एक तर महिनाभर काम थांबवा अन्यथा तलावातील पाणी इतरत्र सोडण्याची व्यवस्था करा असा इशारा महानगरपालिकेला दिला आहे. महानगरपालिकेतर्फे शहरातील तलावांच्या सुशोभीकरणाच्या कामाला मागील काही दिवसांपासून सुरुवात करण्यात आली. मंगाईनगर वडगाव येथील दोन्ही तलावांचेही सुशोभीकरण करण्यासाठी तलावातील पाणी काढले जात आहे. परंतु हे पाणी धामणे-वडगाव शिवारात साडण्यात आले आहे. सध्या शिवारात भाताच्या तसेच गवताच्या गंजा आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी मसूर, वाटाणा, मोहरी पिकांची पेरणी केली आहे. या पाण्यामुळे या सर्व पिकांना तसेच गवताचे नुकसान होत आहे.
महिनाभर काम बंद ठेवा, अन्यथा पाणी इतरत्र वळवा
हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत काम बंद पाडले. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करत महिनाभर काम बंद ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. अन्यथा शिवारात पाणी न सोडता ते इतरत्र सोडावे, अशी सूचना करण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, युवराज नाईक, नाना चतूर, जीवन बिर्जे, गौंडाडकर, आनंद राजगोळकर, प्रसाद जुवेकर, महापालिकेचे अधिकारी परशुराम यांच्यासह इतर उपस्थित होते.