खड्ड्यात झाड लावून नोंदवला निषेध
सातारा :
साताऱ्यात पर्यावरण दिनी सकाळी 11.30 वाजता पंताच्या गोटात प्रिया व्हरायटी येथे सुनील काळेकर या भाजपाच्या माजी नगरसेवकांनी हलगी वाजवत पावसाने पडलेल्या खड्ड्यात झाड लावले. काळेकर यांनी भाजपाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांच्या साताऱ्यात आंदोलन करुन भाजपालाच घरचा आहेर दिल्याची चर्चा साताऱ्यात सुरु होती. दरम्यान, त्यांच्या या आंदोलनामुळे भाजपामध्ये नेमकं चाललंय काय?, सत्ताधारीच रस्त्यावर उतरुन आंदोलन करु लागले आहेत, अशीही चर्चा साताऱ्यात सुरु होती.
जेव्हा भाजपा व शिवसेना विरोधात होती, सत्तेत महाविकास आघाडी होती. तेव्हा सुनील काळेकर हे एक आंदोलनकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी तत्कालिन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील यांच्या सोबत राहून त्या काळात आंदोलनाची सुरुवात केली होती. त्यांनी शहरातील अवैध व्यवसाय, शाळा, कॉलेजच्या प्रवेशाचे आंदोलन, पालिकेत अशुद्ध पाण्यासाठी केलेले आंदोलन, अशी अनेक आंदोलन त्यांची सातारकरांना ज्ञात आहेत. ते भाजपामधून स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत घेतले गेले होते. काही काळ सातारा शहराध्यक्ष म्हणून पदभार दिला होता. भाजपाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून सुनील काळेकर यांची ओळख असून ते शहराध्यक्षपदाच्या निवडीमध्ये इच्छूक होते. त्यांची शहराध्यक्ष म्हणून त्यांचे नावही चर्चेत होते. परंतु त्यांची निवड झाली नाही. त्यामुळे ते काहीसे नाराज होते, अशीही चर्चा सतत सुरु होती. दरम्यान, त्यांनी आंदोलनाचा मुहूर्त म्हणून पर्यावरण दिनाच्या दिवशीचा काढला. सकाळी 11.30 वाजता पंताच्या गोटात पावसाने खचलेल्या जागेवर वाजतगाजत झाड लावले. तसाच प्रकाराचे आंदोलन वायसी कॉलेज, पोवई नाका येथे करुन भाजपाचेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांच्याच साताऱ्यात भाजपाच्या एका माजी नगरसेवकाने केल्याने भाजपामध्ये चालले काय अशी चर्चा सुरु होती.
या आंदोलनात अजय शिवदास, जयश्रीताई काळेकर, प्रसाद चव्हाण, विजय बैताडे, मनोज अवघडे, जॅक पाटोळे, अक्षय वनारे, वैभव हादगे, सचिन दीक्षित, गणेश कारंडे, बॉबी गुप्ता, दत्तात्रय ढमाळ, संभाजी यादव यांनी सहभाग घेतला होता.
- झळकली न्यूज कोळेकर यांची
भाजपाचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे, भाजपाचे खासदार श्री. छत्रपती उदयनराजे यांच्याच साताऱ्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर उतरुन खड्ड्यात झाडे लावण्याचे आंदोलन म्हणजे ब्रेकींग न्यूज. म्हणून साताऱ्यातील सर्व मीडियाचे प्रतिनिधी आर्वजून उपस्थित होते. केळेकर यांनी झाडे लावल्याची न्यूज सगळीकडे लगेच व्हायरल केली. अगदी राज्यात सुद्धा साताऱ्याच्या भाजपामध्ये नेमकं काय सुरु आहे याचीच चर्चा झाली असावी, असेही हे सुनील काळेकर यांचे आंदोलन होते.
....