Kolhapur News: अतिक्रमणधारकांचा कुंरूदवाड पालिकेवर धडक मोर्चा, कारण काय ?
नागरिकांची पालिका अधिकाऱ्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती
कुरुंदवाड (प्रतिनिधी ) : कुरुंदवाडातील अतिक्रमणांच्या मोजणी प्रक्रियेला नगर भूमापन कार्यालयाकडून होणाऱ्या विलंबामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शिरोळ नगरभूमापन कार्यालय आणि कुरुंदवाड पालिकेवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. मोजणीसाठी लाखो रुपयांची फी भरली असतानाही प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने नागरिकांनी पालिकेत ठिय्या मारत अधिकाऱ्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले
दरम्यान मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी नागरिकांची समजूत काढत तत्काळ प्रक्रिया सुरू केली जाईल. अतिक्रमण नियमित करण्यासाठी पालिका प्रशासन गतिमान होईल असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. कुरुंदवाड शहरातील अतिक्रमण मोजणीची फी भरूनही प्रक्रिया पुढे न सरकल्याने संतप्त झालेल्या अतिक्रमणधारकांनी प्रथम शिरोळ येथील नगर भूमापन कार्यालयावर धडक दिली.
यावेळी नागरिकांशी बोलताना नगर भूमापन अधीक्षक गवळी यांनी, ‘मोजणीचे पैसे भरले असले तरी नगरपालिकेकडून प्रस्ताव आला नसल्याने मोजणीची प्रक्रिया पुढे गेली नाही. पालिकेने प्रस्ताव पाठवल्यास 3 तारखेपर्यंत मोजणीची तारीख काढू असे सांगितले. भूमापन कार्यालयाच्या उत्तरामुळे संतप्तझालेले शाहिर आवळे, सिकंदर सरवान, अर्षद बागवानसह नागरिकांनी आपला मोर्चा थेट कुरुंदवाड पालिकेवर वळवला. नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी धारेवर धरले.
पैसे भरले असतानाही नगरपालिकेने मोजणीचा अर्ज आणि प्रस्ताव का पाठवला नाही? गरिबांची कुचेष्टा लावली आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. कर्मचारी संकेत कोथळे यांनी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया वेळेत न केल्याने नागरिकांचा रोष अधिक वाढला. पालिका कार्यालय निरीक्षक श्रद्धा वळवडे, अनिकेत भोसले यांनी नागरिकांचे ऑनलाईन अर्ज तत्काळ भरून 3 तारखेपर्यंत मोजणीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
मात्र, संतप्त नागरिकांनी पालिकेतच ठिय्या मारत ‘आत्ताच ऑनलाईन अर्ज भरा‘ अशी मागणी लावून धरली. मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनाने नागरिक शांत झाले. मात्र, 3 तारखेपर्यंत याबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन सुरू‘ करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला