Shirala News : बिऊर येथील बिबट्या हल्ल्यामुळे शिराळा परिसरात संतप्त वातावरण
शिराळा तालुक्यात बिबट्याचा हल्ला
By प्रितम निकम
शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथील राजवीर पाटील या बालकावर हल्ला करून त्यास ठार मारणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून बिबट्याला पकडण्यासाठी बिऊर, तडवळे, ऊपवळे या गावात सहा ठिकाणी ट्रॅप पिंजरे लावले असून संबंधित परिसरात तीन ड्रोन कॅमेरांचा वाच ठेवला आहे.
शिराळा तालुक्यात बिबट्याकडून लहान मुलांवर व नागरिकांवर हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ऊसाचे क्षेत्र कमी झाल्याने बिबट्यांनी मानवी वस्तीतही प्रवेश केला आहे. गेल्या महिन्यात उपवळे येथील बालकावर बिबट्याने हल्ला केला होता. यात तो दैव बलवत्तर म्हणून वाचला. अशा घटना वारंवार घडत आहेत. शिराळा तालुक्यात पाळीव भटक्या कुत्र्यांबरोबरच वानरांची संख्या ही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
काल बिऊर येथील राजवीर पाटील याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. घटनेअगोदर सदर बिबट्याने सदर बालकाच्या घरातील गायीवर हल्ला केला होता. यावेळी बिबटे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुमची गाय मेली तर गोशाळेतून दुसरी गाय आणून देतो, असे उद्धट उत्तर दिले होते. तर सदरचा बिबट्या अनेक दिवसांपासून हणमंत पाटील यांच्या घराजवळ निदर्शनास येत होता. या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी तुम्हाला इथून पुढे बिबट्यांच्या सानिध्यात राहावं लागेल आमचा नाईलाज आहे असे सांगितले. आणि दुर्दैवाने शेवटी या बिबट्याच्या हल्ल्यात हणमंत पाटील यांच्या लहानग्या राजवीरचा बळी गेला.
वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्ष व हम करेसो कायद्यामुळे जो घडायचा तो अनर्थ घडला. यामुळे शिराळा तालुक्यात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविषयी अतिशय संतप्त वातावरण पसरले आहे. यामुळे सध्या वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांना प्रशासनाने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तर नूतन प्रभारी वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, दत्तात्रय शिंदे वनरक्षक, प्राणीमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड, रेस्क्यू टिम सदस्य युनुस मणेर, नामदेव सिद, संतोष कदम, गौरव गायकवाड, प्राणीमित्र प्रतीक पोळ, पंकज कदम तसेच कोल्हापूर रेस्क्यू टीमचे सदस्य अमोल चव्हाण, विनायक माळी, ओमकार पाटील आदी घटनास्थळी व आसपासच्या परिसरात बिबट्याचा शोध घेत आहेत.शहरातील प्रभाग पाचमध्येही गेल्या आठवड्यात बिबट्या नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यामुळे या प्रभागात अतिशय भितीचेवातावरण पसरले आहे.
आता मानवी वस्तीत
शिराळा तालुक्यात बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रानावनात आढळणारे बिबटे आता शहरात ही आले आहेत. ऊसतोड अंतिम टप्प्यात आल्याने शहराजवळील ऊसाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी झाले आहे. कुत्री, वानर, शेळ्या मेंढ्या व कोंबड्या हे बिबट्याचे मुख्य खाद्य आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय आहे. या जनावरांच्या चटक या बिबट्यांना लागली आहे.
वन अधिकाऱ्यांचा अजब सल्ला
बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी नगरसेवक अवधूत गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते व आम्ही सर्व नागरिकांनी धाव घेतली. घटनास्थळी जाऊन पाहणी करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. आणि सदर ठिकाणचा अडचणीचा परिसर स्वच्छ केला. यावेळी वनविभागाचे अधिकारी याठिकाणी आले, ओझरती पहाणी केली आणि येथील ग्रामस्थांना धीर देणे दूरच परंतु जाता जाता अजब सल्ला दिला की, इथून पुढे तुम्हाला बिबट्याच्या सहवासात रहावे लागेल असा अजब सल्ला देण्यात येत आहे.