Gadhinglaj crime news | गडहिंग्लजमध्ये मुलाला शिवीगाळ का केली विचारल्याचा राग; परिचारिकेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण
गडहिंग्लजमध्ये परिचारिकेवर लोखंडी रॉडने हल्ला
गडहिंग्लज -हनिमनाळ येथील परिचारिका सरिता कुंभार यांनी आपल्या मुलग्याला का शिवीगाळ केली? असे सचिन कुंभार यांना विचारल्याप्रकरणी सचिन यांनी लोखंडी रॉडने मारहाण करत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गडहिंग्लज पोलिसात मनिषा विष्णू कुंभार, कमल वसंत कुंभार आणि सचिन वसंत कुंभार (तिघेही रा. हनिमनाळ ता. गडहिंग्लज) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरिता कुंभार यांच्या राहत्या घरात शनिवारी सायंकाळी ७.३० च्या दरम्यान, सचिन कुंभार यांना मुलगा शौर्य याला शिवीगाळ का केली असे विचारले. यावेळी सचिन कुंभारने तू घरातील भांडी का भरून ठेवलीस, तू येथे यायचे नाही, असे म्हणत शिवीगाळ करून दारात असलेल्या लोखंडी रॉडने पाठिमागून उजव्या बाजूला कमरेवर आणि उजव्या पायावर मारले आणि तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
तर कमल कुंभार यांनी लाथाबुक्क्याने मारहाण केली. मनिषा कुंभार यांनी तू येथे यायचे नाही, तुला काय आहे ते कायद्याने दाखवितो, असे म्हणून शिवीगाळ केल्याप्रकरणी जखमी सरिता कुंभार यांच्या फिर्यादीवरून रविवारी सकाळी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहा. फौजदार शिंदे करीत आहेत.