अनगोळ वारकरी संघाच्यावतीने पंढरपूर येथे भक्त निवासाचा संकल्प
प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ येथील श्री ज्ञानेश्वरी पारायण सेवा अभिवृद्धी संघ तसेच गावातील वारकरी संप्रदाय यांच्यावतीने गोपाळपूर-पंढरपूर गावातील विठ्ठल भक्तांसाठी भक्त निवास बांधण्याचा संकल्प गावातील वारकरी संप्रदाय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
पंढरपूर येथील गोपाळपूर येथे श्री ज्ञानेश्वर पारायण सेवा अभिवृद्धी संघ व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने जागा खरेदी केली. प्लॉट नंबर 68, 69, 70 मधील जवळपास 2250 चौरस फूट जागा गावातील वारकरी संप्रदाय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या आर्थिक मदतीने खरेदी करण्यात आली आहे.
अनगोळमधून भक्त दरवर्षी आषाढी एकादशी व कार्तिक एकादशी रोजी पंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनासाठी दिंडीच्या माध्यमातून जात असतात. गावातून भक्त अधेमध्ये विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जातात. देवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची राहण्याची सोय व्हावी यासाठी गोपाळपूर रस्त्यालगत ही जागा खरेदी करण्यात आली आहे. या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी सुसज्ज भक्त निवास बांधण्याचा संकल्प गावातील वारकरी संप्रदाय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने दानशूर व्यक्तींनी या उपक्रमासाठी भरीव मदत करावी, असे आवाहन ज्ञानेश्वरी पारायण सेवा अभिवृद्धी संघ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी दौलत कंग्राळकर (9538502600) तसेच ज्ञानेश्वरी पारायण सेवा अभिवृद्धी संघ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.