अनगोळ रघुनाथ पेठ रस्त्याची चाळण
बस वाहतूक बंद : विद्यार्थी अन् महिलांचे होताहेत हाल : त्वरित रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
बेळगाव : अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक ते रघुनाथ पेठ हनुमान मंदिरपर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या रस्त्याचे डांबरीकरण आणि मुख्य रस्त्यावरील रहदारीची कोंडी दूर करावी व बस वाहतूक सुरळीत सुरू करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे. अनगोळ येथे गेल्या वर्षभरापासून विविध ठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन घालण्याचे काम सुरू होते. ते संपुष्ठात येऊन आज कित्येक महिने उलटून गेले. अनगोळ धर्मवीर संभाजी चौक ते रघुनाथ पेठ हनुमान मंदिर इथपर्यंतचा गेल्यावर्षी गणेशचतुर्थी नंतर नवीन ड्रेनेज लाईन घालण्याचे काम सुरू करण्यात आले. काही दिवसात काम संपल्यानंतर ड्रेनेज पाईप घालण्यात आलेल्या चरी योग्य पद्धतीने बुजविणे गरजेचे होते, पण त्या ठिकाणी माती ओढण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण गल्लीमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले होते. यावर आवाज उठवल्यानंतर मशिनच्या सहाय्याने दडपण करून त्यावर खडी घालण्यात आली. त्यानंतर या रस्त्याकडे संबधितांनी ढुंकूनही पाहण्यात आले नाही.
नवीन ड्रेनेज पाईप घालतेवेळी नागरिकांच्या असलेल्या जुन्या पाईप फुटून खराब झाल्याने नागरिकांनी ताबडतोब नवीन पाईप स्वखर्चाने बसवून घेतल्या. पण संपूर्ण काम झाल्यानंतर कंत्राटदाराने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या रस्त्यावरील चरीतील माती आता खाली उतरू लागल्याने या सर्व चरी धोकादायक बनल्या आहेत. धर्मवीर संभाजी येथून खणण्यात आलेल्या चरीतील माती उतरत असल्याने आतून पोकळ झाले आहे. तर रस्त्यावरील चरीतील माती गेल्याने मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना हा रस्ता मोठा त्रासदायक ठरत आहे.रघुनाथ पेठ हनुमान मंदिर समोरील रस्ता तर अवघ्या कांही फुटाचा शिल्लक राहिला आहे. या ठिकाणी घालण्यात आलेल्या पाईपलाईनमुळे त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. गेल्या कांही दिवसापासून या रस्त्यावरून बस वाहतूक सुरळीत सुरू झाली होती, पण या खड्ड्यांमुळे बसचालकांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील बस वाहतूक पुर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे गावातील मारूती गल्ली, लोहार गल्ली, नाथ पै नगर, बडमंजी नगर तसेच गावातील नवीन वसाहतीतील महिला, नागरिक व विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. बससाठी विद्यार्थी व नागरिकांना मराठी शाळेपर्यंत चालत यावे लागत आहे. या बस बंदचा फटका परिवहन मंडळाच्या उत्पन्नावर होत आहे तर याचा फायदा वडाप रिक्षाचालकांना होत आहे.
खराब रस्ता-पार्किंगमुळे बस बंद
अनगोळ बस ही महात्मा गांधी स्मारक लक्ष्मी मंदिर इथपर्यंत जात असे. पण आता शेवटचा बस थांबा हा मराठी शाळा नंबर 34 मुख्य रस्त्यावर केला जात आहे. या संदर्भात बस कंट्रोलर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की रघुनाथ पेठ येथील रस्त्याची झालेली दुरवस्था आणि रघुनाथ पेठ, मारूती मंदिर कॉर्नर ते शेवटच्या बस थांब्यापर्यंत जागोजागी वाहनांचे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पार्किंग यामुळे बस शेवटच्या स्थानकापर्यंत जाणे बंद झाली आहे.
निवेदन देऊनही दुर्लक्ष
रघुनाथ पेठ येथुन धर्मवीर संभाजी चौक पर्यंतचा रस्ता हा कल्पनेपुरता राहिला आहे. या रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात चरी आणि खड्डे पडले आहेत की समोरून येणाऱ्या वाहनचालक व नागरिकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. अनगोळ भागातील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी पालकमंत्री, महापौर, महानगरपालिका आयुक्त यांना या रस्त्या संदर्भात वेळोवेळी निवेदने दिली आहेत.