For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनगोळ ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ

11:57 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अनगोळ ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ
Advertisement

माऊलींची मिरवणूक उत्साहात : पारायण सोहळा पाच दिवस चालणार

Advertisement

बेळगाव : येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नाथ पै नगर येथे ज्ञानेश्वरी पारायण मंडळ यांच्यावतीने आयोजित ज्ञानेश्वरी पारायणाचा उद्घाटन सोहळा व माऊली मिरवणूक मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडली. टाळ मृदंगाची साथ आणि ‘जय जय राम कृष्ण हरी’चा गजर व अभंग, डोईवर तुळस, डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी, खांद्यावर भगवी पताका तसेच आकर्षक सजावट केलेल्या बैलजोड्या आणि माऊलींचा जयजयकार करीत माऊलींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूक नाथ पै नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून सुरू झाली. प्रमुख पाहुणे म्हणून मंडप डेकोरेटर लक्ष्मण बुद्रूक, टिळकवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवानंद उपस्थित होते. लक्ष्मण बुद्रूक यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची व रथाची पूजा करण्यात आली. पोलीस अधिकारी शिवानंद यांच्या हस्ते

ट्रॅक्टर पूजनाने मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक बडमंजी नगर, बाबले गल्ली, रघुनाथ पेठ, धर्मवीर संभाजी चौक, राजहंस गल्ली येथे पोहचली. राजहंस गल्ली पंच कमिटी, नागरिक तसेच श्रीराम युवक मंडळ यांच्यावतीने हरी भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यानंतर मिरवणूक मरगाई मंदिर, कलमेश्वर मंदिर, हणमण्णावर गल्ली, मराठा चौक, भांदूर गल्ली, सुभाष गल्ली, म. गांधी स्मारक, लक्ष्मी गल्ली, मारुती गल्ली, लोहार गल्लीमार्गे नाथ पै नगर येथे पोहचली. हा पारायण सोहळा पाच दिवस चालणार आहे. बुधवारी सकाळी 7 वा. संकल्प पूजा, गणपती पूजा, विठ्ठल रुक्मिणी पूजन, ज्ञानेश्वरी माऊली प्रतिमा अभिषेक, पोथी स्थापना, श्री गुरु वासकर महाराज फोटो पूजन, वीणा-टाळ, मृदंग, पताका, तुळस पूजन होईल. पाच दिवस रोज सकाळी काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन व नामजप, रात्री कीर्तन सोहळा होणार आहे. रविवारी पालखी मिरवणूक, नगर प्रदक्षिणा, दिंडी सोहळा, महामंगलारती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.